चक्रीवादळांमुळे नुकसान झालेल्या मच्छिमार बांधवांना रुपये १ हजार कोटी अनुदान केंद्र सरकारने द्यावे.

हिंदुस्थानला सुमारे ७५१७ किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. या किनारपट्टीमध्ये अनेक नागरी वसाहती आहेत. विशेषतः किनारपट्टीलगतच्या भागात मच्छिमार बांधवांचे वास्तव्य असते. समुद्रात येणाऱ्या वादळांमुळे किनारपट्टीभागातील अतोनात आर्थिक आणि जैविक नुकसान होते. मागच्या १२ वर्षात या समुद्रकिनारपट्टीवर अनेक चक्रीवादळे आली. त्यामध्ये २००९ फयान, २०१९ वायु, २०२० निसर्ग तसेच यावर्षी आलेल्या तौक्ते चक्रीवादळांमुळे मच्छिमार बांधवांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले. देशाला लाभलेल्या एकूण समुद्रकिनाऱ्यापैकी महाराष्ट्र राज्याला सुमारे ७२० किमीचा समुद्रकिनारा लागतो. या किनारपट्टीवर राहणाऱ्या नागरिक व मच्छिमारांचे गेले काही वर्षे सातत्याने करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. सामान्य नागरिक तसेच मच्छिमार बांधवांवर ओढवलेल्या या संकटामधून त्याना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान अनुदान योजनेतून महाराष्ट्रातील मच्छिमार बांधवांना किमान एक हजार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी आज ७ डिसेंबर रोजी संसदेच्या शुन्य प्रहरात केली.