लोकाधिकार चळवळीतील खंदा सहकारी सुभाष सावंत यांना भावपूर्ण श्रध्दांजली

बँकींग कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कासाठी सातत्याने लढाऊ बाण्याने कार्यरत असणारा बँक कर्मचाऱ्यांचा बुलंद आवाज व आक्रमक चेहरा सुभाष सावंत यांचे करोनामुळे आज वयाच्या ७० व्या वर्षी दुःखद निधन झाले. शिवसेना, लोकाधिकार समिती महासंघ व बँक कामगार संघटनेच्या वतीने मी भावपूर्ण श्रध्दांजली  अर्पण करतो.

सिंधुदुर्गातील आवळेगाव या छोट्याशा गावातून मुंबईत स्थिरावलेला सेंट्रल बँक ऑफ इंडिया नोकरीला असलेला सुभाष सावंत कालांतराने सर्व राष्ट्रीयकृत बँकेच्या कर्मचाऱ्यांचा लढावू नेता म्हणून उदयास आला. बँक कर्माचाऱ्यांवर होणाऱ्या अन्यायाविरुध्द सतत आवाज उठवत होता. सतत संघर्ष करीत होता. शिवसेनाप्रणित स्थानिय लोकाधिकार चळवळीत सतत अग्रस्थानी राहुन पाठबळ देत होता. कष्टाळू, अभ्यासू वृत्तीचा सुभाष सावंत बँक कर्मचाऱ्यांच्या मागणीसाठी आंदोलनाचे नेतृत्व करीत होता. केंद्र शासनाशी पत्रव्यवहार, चर्चा करीत होता तसेच अखिल भारतीय बँक कर्मचारी संघटनेच्या परिषदमधून मार्गदर्शन करीत होता.

सत्यशिल व परोपकारी वृत्तीच्या सुभाष सावंत यांच्या निधनाने एका थोर नेत्याला आम्ही आज गमावले आहे.

सुभाष सावंत यांच्या पश्चात त्यांची सुविद्य पत्नी, एक मुलगा, मुलगी, जावई  आणि नातु असा परिवार आहे.

बँकींग जगतातील कर्मचारी संघटना, लोकाधिकार महासंघामधील असंख्य कार्यकर्ते तसेच पदाधिकारी सुभाष सावंत यांना भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण करीत आहोत. त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही त्यांचे सहकारी म्हणून सदैव पाठबळ देत राहु.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो!