रेल्‍वे मंत्रालयाच्‍या पुरवणी मागण्‍यांवर आग्रही मागण्‍या

मुंबई शहरातील उपनगरीय रेल्‍वे मध्‍ये दररोज किमान ७० लाख प्रवासी प्रवास करतात. मुंबईच्‍या जनतेसाठी रेल्‍वे ही जीवनरेखा मानण्‍यात येते, म्‍हणून या प्रवाश्‍यांना व रेल्‍वे लगतच्‍या झोपडपट्टी धारकांना अनेक समस्‍यांना सामोरे जावे लागते. याबाबत खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज संसदेत पुरवणी मागण्‍यांच्‍या वेळी आग्रही मागण्‍या केल्‍या

मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहाव्‍या लाईनीमध्‍ये बाधीत होणाया २३ पात्र झोपडपट्टीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही, ते तातडीने करण्‍यात यावे. इंदिरा नगर, जोगेश्‍वरी (पूर्व) येथील १२० पैकी ११४ पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन करण्‍यात आले, परंतु ६ नागरीकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. आंबोली पादचारी पुलालगत ३५ पात्र झोपडपट्टीधारकांचे अद्याप पुनर्वसन झालेले नाही. आंबेडकर नगर, सोनावाला कंपाऊंड रोड येथील ६० पात्र झोपडपट्टीधारकांचे पुनर्वसन झालेले नाही. या सर्व पात्र बाधीतांचे कायमस्‍वरूपी पुनर्वसन करण्‍यात यावे अशी मागणी केली.   

मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी लाईन विस्‍तारीकरणाचे काम अत्‍यंत धीम्‍या गतीने होत आहे. याकरिता रू. १११७ कोटी निधी त्‍वरीत वितरीत करण्‍यात यावा. जोगेश्‍वरी रेल्‍वे स्‍टेशन, मुंबई येथे पश्चिम रेल्‍वेच्‍या मालकीचा ७० एकरचा भूखंड आहे, यावर टर्मिनस बांधण्‍यात यावे, ज्‍यामुळे अंधेरी ते बोरीवली प्रवाश्‍यांना सोयीचे होणार आहे तसेच मुंबई सेंट्रल व बान्‍द्रा टर्मिनस वरील ताण कमी होणार आहे. गोरेगाव ते बोरीवली हार्बर लाईनचे विस्‍तारीकरणाचे काम अत्‍यंत धीम्‍या गतीने चालू आहे, यासाठी आवश्‍यक असणारी जमीन पश्चिम रेल्‍वेने संपादीत केली आहे, परंतु अद्याप लोहमार्ग टाकण्‍यास सुरूवात केलेली नाही. मुंबई उपनगरीय रेल्‍वे मार्गाच्‍या दोन्‍ही बाजूस संरक्षक भिंत नाही, त्‍यामुळे प्रवासी रूळ ओलांडताना मृत्‍यूमुखी पडतात, जखमी होतात. उपनगरातील १२२ कि.मी. लोहमार्गाच्‍या दुतर्फा त्‍वरीत संरक्षक भिंत बांधण्‍यात यावी.

जुचंद्र ते दिवा टर्मिनस हा ३ कि.मी.चा लोहमार्ग बनविणे अत्‍यंत आवश्‍यक आहे, वांद्रे येथून कोकणात जाणाया गाड्यांना वसई पर्यंत जाऊन उलट फिरून दिवा स्‍थानकापर्यंत जावे लागते, यामुळे रेल्‍वेच्‍या वेळेचे व आर्थिक नुकसान देखील होत आहे. सदर मार्ग झाल्‍यास वांद्रे येथून कोकण, शिर्डी, पंढरपूर या सारख्‍या ठिकाणी रेल्‍वे सेवा सुरू करणे शक्‍य होणार आहे. अशा आग्रही मागण्‍या खासदार गजानन कीर्तिकर यांनी आज संसदेत केल्‍या