महाराष्‍ट्रातील वारकऱ्यांच्या समस्‍यांबाबत शिवसेना खासदारांच्या शिष्टमंडळाने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली.

महाराष्‍ट्रात व लगतच्‍या आंध्रप्रदेश, कर्नाटक या राज्‍यांमधून लाखो वारकरी, भाविक श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी व कीर्तिकी वारीसाठी येत असतात. त्‍यांना भेडसावणा-या समस्‍यांबाबत श्री ज्ञानेश्‍वर महाराज पालखी सोहळा दिंडी समाज यांच्‍या पदाधिका-यांनी खासदार गजानन कीर्तिकर यांची भेट घेऊन निवेदन सादर केले होते. या समस्‍यांपैकी विशेषत: सासवड, फलटण राष्‍ट्रीय महामार्गावरील कराह नदीवरील पुलाचे बांधकाम अत्‍यंत धीम्‍या गतीने चालू असून जुन्‍या पुलाचा वापर करावा लागतो, त्‍यामुळे वाहतूक कोंडी होते तसेच सदर जुना पूल हा अत्‍यंत मोडकळीस आला असल्‍यामुळे भविष्‍यात दुर्घटनाही होऊ शकते. सदर पुलाच्‍या दोन्‍ही बाजूस चार पदरी राष्‍ट्रीय महामार्ग बांधण्‍यात आला आहे, त्‍यामुळे वारक-यांनी समाधान व्‍यक्त केले आहे. 

तसेच राष्‍ट्रीय महामार्ग प्राधिकरण, पुणे विभाग येथील समितीवर वारकरी सांप्रदायाचा एक प्रतिनिधी नेमण्‍यात यावा जेणेकरून राष्‍ट्रीय महामार्गावरील समस्‍यांबाबत वेळोवेळी वारकरी सांप्रदायाच्‍या वतीने सूचना सादर करता येतील. 

उपरोक्‍त समस्‍यांबाबत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली केन्‍द्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आज भेट घेतली. त्‍याप्रसंगी मावळचे खासदार श्रीरंग बारणे व यवतमाळच्‍या खासदार भावना गवळी उपस्थित होत्‍या. याबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी तात्‍काळ संबंधित अधिका-यांना फोनव्‍दारे कार्यवाही करण्‍याचे आदेश दिले.