शिपिंग कॉरीडॉर ८० मैलापर्यंत स्थानांतरीत करण्याबाबत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची संसदेत आग्रही मागणी

मालवाहू जहाजांसाठी समुद्रकिनाऱ्यापासून अंदाजे १५ ते ३५ सागरी मैलमध्ये शिपिंग कॉरीडॉर केंद्र सरकारने प्रस्तावित केलेला आहे. मच्छिमार बांधव १५ ते ३५ सागरी मैलमध्ये मासेमारी करतात. समुद्र किनारी राहणाऱ्या मच्छिमार बांधवांचे मासेमारी हे एकमेव उत्पन्नाचे साधन आहे. पिढ्यानपिढ्या सागरी किनारी राहणाऱ्या मच्छिमार बांधवांमध्ये या शिपिंग कॉरीडॉरमुळे भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. याच क्षेत्रामध्ये शिपिंग कॉरीडॉर निश्चित केल्यास मासेमाऱ्यांची पसरलेली जाळी तुटून मोठ्या मालवाहू जहाजांमुळे समुद्रात प्रदुषण होऊन मत्स्यव्यवसायावर विपरीत परिणाम होणार आहे. म्हणून केंद्र शासनाने प्रस्तावित शिपिंग कॉरीडॉर १५ ते ३५ मैलऐवजी ८० सागरी मैला पलिकडे स्थानांतरीत करुन मच्छिमार बांधवांना दिलासा द्यावा, अशी आग्रही मागणी काल शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी संसदेच्या सभागृहात शुन्यप्रहरात मांडली.