संसदेत रेल्‍वे मंत्रालय पुरवणी मागण्‍यांवर खा. गजानन कीर्तिकर यांच्‍या आग्रही मागण्‍या

महाराष्‍ट्र राज्‍यामध्‍ये झोपडपट्टी पुनर्वसन योजने अंतर्गत केंद्र शासनाच्‍या भुखंडावर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्‍यासाठी परवानगी मिळत नाही. त्‍यामुळे इंदिरा नगर, जोगेश्‍वरी (पूर्व), जय अंबे वेल्‍फेअर सोसायटी, सोनावाला रोड, गोरेगाव (पूर्व), आंबोली रेल्‍वे फाटक पादचारी उड्डानपूला जवळील व मुंबईतील अनेक रेल्‍वे भुखंडांवरील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करण्‍यासाठी महाराष्‍ट्र शासनाला परवानगी द्यावी. पंतप्रधान आवास योजनेमध्‍ये केंद्र शासनाच्‍या जमिनींवरील झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन करणे ही त्‍या त्‍या मंत्रालयाची जबाबदारी आहे असे स्‍वयंस्‍पष्‍ट नमुद केले असताना देखील रेल्‍वे मंत्रालय दुर्लक्ष करीत आहे.

वांद्रे ते बोरीवली ६ वी रेल्‍वे लाईनसाठी रू. १ हजार ११७ कोटी निधीची आवश्‍यकता आहे. यापैकी अत्‍यंत अपुरा निधी रेल्‍वे मंत्रालयाने वाटप केला आहे. उर्वरीत निधी तात्‍काळ मंजुर करावा. रेल्‍वे मंत्रालयाने जाहीर केल्‍यानुसारे मार्च २०२३ पर्यंत ६व्‍या रेल्‍वे लाईनचे काम पूर्ण होणे अत्‍यंत गरजेचे आहे.

खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या सततच्‍या पाठपुराव्‍यामुळे अंधेरी ते गोरेगाव हार्बर लाईन चालू झाली. परंतु गोरेगाव ते बोरीवली विस्‍तारीकरणासाठी आवश्‍यक असणारा रू. ८४६ कोटी निधी तात्‍काळ उपलब्‍ध करून काम पूर्ण करावे तसेच गोरेगाव ते पनवेल हार्बर रेल्‍वे सेवा तात्‍काळ सुरू करण्‍यात यावी.

पश्चिम रेल्‍वेने सन १९७६ साली जुन्‍या पध्‍दतीने जमिनीची मोजणी करून चुकीची हद्द निश्चित केली. उदा. रामनगर, गोरेगाव (पूर्व) यांनी सध्‍या नव्‍या तंत्रज्ञानानुसारे मोजणी केली असता रामनगर परिसर रेल्‍वे हद्दीमध्‍ये समाविष्‍ट होत नसुन खाजगी कंपनीच्‍या नावे सदर भुखंड आहे. म्‍हणून त्‍यांचेवर निष्‍कांसनाची कारवाई करण्‍यास स्‍थगिती द्यावी. रेल्‍वे प्रशासनाने महाराष्‍ट्र शासनाच्‍या महसुल विभागाबरोबर अद्ययावत तंत्रज्ञानाने मोजणी करून रेल्‍वेची हद्द निश्चित करावी.

जोगेश्‍वरी – राम मंदिर रेल्‍वे स्‍थानकांच्‍या पूर्व बाजूस ७० एकर क्षेत्रफळाचा रेल्‍वेचा रिक्‍त भुखंड आहे, येथे जोगेश्‍वरी टर्मिनस विकसीत करावे. त्‍यामुळे मुंबई सेंट्रल, बान्‍द्रा, दादर येथील टर्मिनस वरील ताण कमी होईल.

मुंबई उपनगरीय रेल्‍वे लाईन लगत अनेक नागरी वसाहती आहेत. रेल्‍वे गाड्यांच्‍या आवाजामुळे ध्‍वनी प्रदुषण होत आहे. या सर्व रेल्‍वे लाईन लगत साऊंडप्रुफ बॅरियर बसविण्‍यात यावेत.

मुंबई उपनगरीय रेल्‍वे लगत एकूण १२२ कि.मी. लांबीची कंपाऊंड भिंत बांधण्‍यात यावी, जेणेकरून रेल्‍वे लाईन ओलांडताना होणारे प्रवासी अपघातास आळा बसेल.

मार्च २०१६ साली कॅटरींग इन्‍स्‍पेक्‍टर (कमर्शीयल) भरती प्रक्रिया सुरू केली. रेल्‍वे रिक्रुटमेंट बोर्डाने सदर भरती प्रक्रिया पूर्ण केली व निवडण्‍यात आलेल्‍या उमेदवारांना आयआरसीटीसी मध्‍ये समाविष्‍ट करून घेण्‍यासाठी आदेश दिले.परंतु आजपर्यंत आयआरसीटीसीने या निवडलेल्‍या उमेदवारांना नोकरीत समाविष्‍ट करून घेतलेले नाही. तात्‍काळ आयआरसीटीसी ने या निवड झालेल्‍या उमेदवारांना नोकरीत समाविष्‍ट करून घ्‍यावे.

चर्चगेट ते विरार एलीवेटेड रेल्‍वे लाईन प्रस्‍तावास अग्रक्रम द्यावा.

वांद्रे टर्मिनस-मुंबई येथून हंगामी कोकण रेल्‍वे मार्गे सावंतवाडी, मडगांव (गोवा) पर्यंत ट्रेन जातात. वसई, जि. पालघर पर्यंत जाऊन वसई-दिवा-पनवेल यामार्गाने या गाड्या जातात. वसईच्‍या आधी नायगाव ते वसई-दिवा मार्ग जोडणारी फक्‍त ३ कि.मी. लांबीची नवीन रेल्‍वे लाईन टाकल्‍यास रेल्‍वेला सोयीचे होणार आहे. ही ३ कि.मी. लांबीची रेल्‍वे लाईन टाकून कायमस्‍वरूपी बान्‍द्रा ते सावंतवाडी, मडगाव, शिर्डी, पंढरपूर, शेगाव या धार्मिक स्‍थळांसाठी दररोज रेल्‍वे सेवा सुरू करावी.