कलादिग्दर्शक राजू सापते यांच्या आत्महत्येस जबाबदार असणाऱ्या कामगार युनियनच्या भोंगळ कारभाराबाबत पत्रकारांशी संवाद

मुंबईच्‍या बॉलीवूडमध्‍ये निर्माण होणारे चित्रपट, दुरदर्शन मालिका, गाणी हे आंतरराष्‍ट्रीय स्‍तरावर प्रसिध्‍द झालेले आहेत, एवढे योगदान ह्या बॉलीवूडचे आहे. बॉलीवूडच्‍या व्‍यवसायामध्‍ये अनेक नामांकित सुपरस्‍टार प्रसिध्‍द झाले, त्‍यांनी अमाप संपत्‍ती कमावली, एका-एका घराण्‍याचे उदा. कपूर घराणे, बच्‍चन घराणे अशा अनेक पिढीचे कलावंत ह्या इंडस्‍ट्रीतून मिळाले. या जगप्रसिध्‍द चित्रपट निर्मितीमध्‍ये पडद्यामागे काम करणारे असंख्‍य कामगार, टेक्‍नीशीयन, स्‍टोरी रायटर, दिग्‍दर्शक, कला दिग्‍दर्शक व सहयोगी कलाकार यांचे इंडस्‍ट्रीमध्‍ये योगदान मोठे आहे. या क्षेत्रामध्‍ये ज्‍या कामगार संघटना आहेत, त्‍यांचेकडून कामगारांना संरक्षण मिळते. त्‍यातील फिल्‍म स्‍टुडिओज सेटींग अॅन्‍ड अलाईड मजदूर युनियन ही जुनी कामगार संघटना आहे. एकेकाळी या संघटनेचे नेतृत्‍व ज्‍येष्‍ठ कलावंत मिथुन चक्रवर्ती यांनी करून कामगारांना न्‍याय दिला. 

परंतु ह्या कामगार संघटनेमध्‍ये काहीही योगदान नसलेले व कोणताही संबंध नसणा-या अशा चांडाळ चौकडीने ह्या संघटनेवर कब्‍जा केला आहे. या संघटनेचे अनधिकृत पदाधिकारी असलेले श्री. गांगेश्‍वरलाल श्रीवास्‍तव (संजू), श्री. राकेश मौर्या, श्री. अशोक दुबे, श्री. बी.एन.तिवारी हे चित्रपट निर्माते, कला दिग्‍दर्शक, स्‍टुडिओतील कंत्राटी कामगार यांना धाकदपटशा दाखवून वेळप्रसंगी हाणामारी करून, कामगार कायद्याचे उल्‍लंघन करून, नियमबाह्य पध्‍दतीने युनियनचा कारभार चालवत आहेत. यामध्‍ये राकेश मौर्या यांनी केलेल्‍या अडवणूकीमुळे कला दिग्‍दर्शक राजू साप्‍ते यांनी व्‍हीडिओ क्‍लीपव्‍दारे राकेश मौर्याचा उल्‍लेख करून आत्‍महत्‍या केली आहे. कामगारांच्या हिताचे कोणतेही काम ही चांडाळ चौकडी करीत नाही. या युनियनच्‍या वादाबाबत मा. इंडस्‍ट्रीयल कोर्टामध्‍ये सदर बाब न्‍यायप्रविष्‍ठ असून देखील श्री. गांगेश्‍वरलाल श्रीवास्‍तव व त्‍याचे सहकारी अनधिकृतपणे युनियनचे कामकाज चालवत आहेत. 

याबाबत मागील १ वर्षाच्‍या कालावधीपासून रजिस्‍टार ऑफ ट्रेड युनियन यांचेकडे तसेच कामगार आयुक्‍त श्री. महेंद्र कल्‍याणकर (आयएएस) यांचेकडे व आयुक्‍त कार्यालयातील निलंबीत उप निबंधक श्री. आनंद भोसले निलंबीत वरिष्‍ठ लिपीक श्री. साळुंखे यांचेकडे वेळोवेळी पत्रव्‍यवहार व दोन वेळा बैठक घेऊनही कामगार आयुक्‍त यांनी ह्या बेकायदेशीर कृतीला कोणताही प्रतिबंध केला नाही. स्‍टुडिओमध्‍ये ह्या कंपूची जी दादागिरी चालते याबद्दल पोलीस उपायुक्‍तझोन १२ व चित्रनगरीच्‍या हद्दीतील आरे पोलीस ठाणेच्या वरिष्‍ठ पोलीस निरीक्षक श्रीमती नुतन पवार तसेच दादासाहेब फाळके चित्रनगरीच्‍या व्‍यवस्‍थापकीय संचालक श्रीमती मनिषा वर्मा तसेच चित्रनगरीचे सुरक्षा अधिकारी श्री. अशोक जाधव यांचेकडे कैफियत मांडूनही त्‍यांनी देखील या बाबींकडे दुर्लक्ष केल्‍यामुळेच कला दिग्‍दर्शक राजू साप्‍ते यांना आपला जीव गमवावा लागला आहे.  

याप्रकरणी सर्व प्रशासकीय यंत्रणांनी गंभीर दखल घेऊन वेळीच कार्यवाही करणे गरजेचे आहे, अन्‍यथा अशाच प्रकारे आत्‍महत्‍येचे सत्र सुरू राहील. याबाबत प्रशासनाने तातडीने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी अशी मागणी करीत आहे. कामगार आयुक्‍त यांनी तात्‍काळ सदर युनियनच्‍या कारभारावर प्रशासक नियुक्‍त करून अनियमित कारभाराची चौकशी करण्‍यात यावी. ह्या युनियनच्‍या पदाधिका-यांनी मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्‍यवहार केला असून त्‍याबाबत आर्थिक गुन्‍हे अन्‍वेषण शाखेकडे (EOW) तक्रार करण्‍यात आली असून याबद्दल सखोल तपास करून कार्यवाही करण्‍यात यावी. निर्माते, कला दिग्‍दर्शक, कामगार यांना धाकदपटशा व मारहाण केली जाते, त्‍याविरध्‍द पोलीसांनी कारवाई करून त्‍यांच्‍या कृतीला आळा घालावा. तसेच कै. राजू साप्‍ते यांच्‍या आत्‍महत्‍येला जबाबदार राकेश मौर्या व अन्‍य यांचेविरध्‍द भा.द.वि. ३०६ व ५०९ अन्‍वये फौजदारी गुन्‍हा नोंदवून कारवाई करण्‍यात यावी. यांसदर्भात शिवसेना चित्रपट सेनेचे अध्‍यक्ष श्री. आदेश बांदेकर हे अतिरिक्‍त पोलीस आयुक्‍त श्री. विश्‍वास नांगरे-पाटील यांची भेट घेणार आहेत.