मुंबई–गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? – खासदार गजानन कीर्तिकर

 

नवी दिल्‍ली, ता. 27 : कोकणवासियांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम कधी पूर्ण होणार? असा खडा सवाल आज शिवसेनेचे उत्तर-पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघाचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी उपस्थित केला. गतलोकसभेत विविध अभ्यासपूर्ण प्रश्न मांडणाऱ्या खासदार श्री. कीर्तिकर यांनी यावेळी देखील नागरिकांच्या रोजच्या जीवनाशी निगडीत प्रश्न उपस्थित करण्यावर भर दिला आहे.

गेली अनेक वर्ष अपूर्णावस्थेत असणाऱ्या या महामार्गावरून अनेकदा राजकारण झाले. सभागृहात याविषयी आवाज उठविताना मुंबईतून गोवा, कोकण आणि महाबळेश्वर या पर्यटनस्थळांना भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. काम अपूर्णावस्थेत असल्याने पर्यटकांना त्याचप्रमाणे कोकणवासियांना प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागते. भूसंपादनासाठी इंदापूर ते कशेडी रु. १२४० कोटी, कशेडी ते ओझरखोल रु. १०२७, ओझरखोल ते राजापूर ९६० कोटी, राजापूर ते झाराप  रु. ९६० कोटी इतक्या निधीची तरतूद करूनही कामात दिरंगाई का होत आहे?  सदर महामार्गाचे कामास दिरंगाई करणाऱ्या कंत्राटदारांवर काय कारवाई केली गेली? शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला कधी मिळणार? आणि महामार्गाचे काम पूर्णत्वास कधी जाणार इत्यादी मुद्दे खासदार श्री. कीर्तिकर यांनी मांडले.

त्यावर उत्तर देताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी, संबंधित महामार्गात अडथळा ठरणाऱ्या तांत्रिक अडचणी सोडविण्यात मला यश आले असून, सिंधुदुर्ग ते गोवा हा टप्पा बहुतांशी पूर्ण झाला असल्याचे नमूद केले. त्याचप्रमाणे भूसंपादन आणि जमिन मोबदला याविषयीचे देखील काम पूर्ण झाले आहे. संबंधित महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेत कोणाला मोबदला मिळाला नसल्यास आपण शेतकऱ्यांना थेट माझ्यापर्यंत घेऊन येऊ शकता, मी त्यांच्या समस्यांचे निवारण करीन व हा महामार्ग डिसेंबर महिन्याच्या शेवटी पूर्णत्वास जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.