तोक्‍ते चक्रीवादळाच्‍या पार्श्‍वभमीवर वर्सोवा कोळीवाड्यातील विविध समस्‍यांसाठी शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांची वर्सोवा बंदरावर अधिका-यांसमवेत पाहणी

तोक्‍ते चक्रीवादळाचा फटका महाराष्‍ट्रातील कोकणासह मुंबईतील कोळीवाड्यांना बसला, वर्सोवा बंदरातील (अंधेरी पश्चिम) मासेमारी बोटींचे देखील या वादळात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वर्सोवा येथे कोळी बांधव परंपरागत वास्‍तव्‍य करीत असून याठिकाणी सुमारे ३५० बोटी असून त्‍यातील बहुसंख्‍य बोटींचे नुकसान झाले. बंदरावर उभ्या केलेल्‍या काही बोटी खडकावर आदळून फुटल्‍या, काहींची यंत्रे पाणी शिरल्‍यामुळे निकामी झाली, तसेच जाळी देखील वाहून गेल्‍याने मच्‍छीमार बांधवांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले. या नुकसानाची पाहणी करण्‍यासाठी  शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांच्‍या नेतृत्‍वाखाली स्‍थानिक नगरसेविका व बाजार उद्यान समितीच्‍या अध्‍यक्षा प्रतिमा खोपडे, आरोग्‍य समितीच्‍या अध्‍यक्षा राजुल पटेल, माजी स्‍थायी समिती अध्‍यक्ष शैलेश फणसे, उपविभागप्रमुख राजेश शेट्ये, जागृती भानजी, शाखाप्रमुख सतिश परब, महिला शाखा संघटक बेबी पाटील, रंजना पाटील, पूजा पाटील, माजी शाखाप्रमुख सुनील बोले इ. पदाधिकारी उपस्थित होते. 

याठिकाणी पाहणी केल्‍यानंतर खासदार कीर्तिकर यांनी तहसिलदार श्री. सचिन भालेराव, फिशरीजच्‍या अधिकारी श्रीमती शांता शितुत, परवाने अधिकारी गजानन बुंदेले यांच्‍यासह बैठक घेतली. यावेळी वर्सोवा बंदरावरील नुकसान झालेल्‍या बोटींची पाहणी करून पंचनामे करण्‍याची कार्यवाही आजपासून मत्‍स्य विभागातर्फे सुरू झाल्‍याची माहिती दिली. ह्या बैठकीस वेसावा कोळी जमात ट्रस्‍ट, वेसावा विविध सहकारी सोसायटी लि., वेसावा सर्वोदय सहकारी सोसायटी लि., वेसावा सहकारी सोसायटी लि. व वेसावा ट्रॉलर्स नाखवा मंडळ ह्या मच्‍छीमार सोसायट्यांचे प्रतिनिधी पराग भावे, देवेंद्र काळे, संदीप भानजी, सचिन चिंचय, किशोर भेक्‍ली, चंदन पाटील, प्रेमनाथ भानजी, महेंद्र लडगे, नारायण कोळी आदी कोळी बांधव गा-हाणे मांडण्‍यासाठी उपस्थित होते. पंचनामे करण्‍याचे काम लवकरात लवकर पूर्ण करून शासनास अहवाल सादर करण्‍याची सूचना खासदार कीर्तिकर यांनी अधिका-यांना केली. 

या बंदरातील मच्‍छीमारांना २५ महिन्यांचा डिझेल परतावा अजूनही शासनाकडून उपलब्‍ध झालेला नाही तो तात्‍काळ मिळावा तसेच एलईडी लाईटवर मच्छीमारी करण्‍यास कायद्याने बंदी असून त्‍याची सक्‍त अंमलबजावणी करण्‍यात यावी अशा मागण्‍या सोसायटीच्‍या प्रतिनिधींनी केल्‍या. याबद्दल मुख्‍यमंत्री यांचेसोबत लवकरच बैठक आयोजित करून निवेदन सादर करण्‍याचे आश्‍वासन खासदार गजानन कीर्तिकर यांनी दिले.