वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण संस्थेस निधी उपलब्ध करून द्या – खासदार गजानन कीर्तिकर

 

कर्मचारी वर्गाच्या हितासाठी संघर्ष करणारे खासदार म्हणून परिचित असलेले शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पुन्हा एकदा कर्मचारी हितासाठी लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात आवाज उठविला. वर्सोवा येथील केंद्रीय मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण संस्थेतील गेले २० वर्ष कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्या १३३ कर्मचाऱ्यांनी खासदार कीर्तिकर यांची भेट घेतली होती. या संस्थेतील २० कामगारांना यावर्षी नोकरीवरून कमी करण्यात आले होते. संस्थेच्या कुलगुरूंची खासदार श्री.कीर्तिकर यांनी भेट घेऊन चर्चा केल्यानंतर कामगारांना कायमस्वरुपी तत्वावर कामावर रुजू करण्यास निधीची कमतरता असल्याचे कारण समोर आले. त्यामुळे येथे कंत्राटी कामगार पुरवणाऱ्या ठेकेदारांचे आयतेच फावले होते. परिणामी कंत्राटदार तुपाशी आणि कामगार उपाशी अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे निदर्शनास आले.

या सर्व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी हा प्रश्न लोकसभा अधिवेशनात उपस्थित करीन आणि तुम्हाला न्याय मिळेपर्यंत पाठपुरावा करत राहील असे आश्वासन श्री. कीर्तिकर यांनी कर्मचाऱ्यांना दिले होते. दिलेला शब्द पाळत, नियम ३७७ अन्वये कीर्तिकरांनी आज अधिवेशनात प्रश्न उपस्थित करत केंद्र शासनाकडे रू. २.५० कोटी इतक्या निधीची मागणी करून कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी नोकरीवर रुजू करण्याची विनंती केंद्र शासनाकडे केली. खासदार कीर्तिकरांच्या या मागणीमुळे संस्थेतील १३३ स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळणार असून त्यातील अधिकाधिक कर्मचारी मच्छीमार समाजाचे आहेत.