गोरेगाव पूर्व येथील आरे रूग्‍णालय आयुष मंत्रालयामार्फत सुरू करण्‍यासाठी खासदार गजानन कीर्तिकर यांनी घेतली आरोग्‍य मंत्री ना. राजेश टोपे यांची भेट

मुंबईतील गोरेगाव पूर्व, आरे दुग्‍ध वसाहतीमधील युनिट क्र. १६ येथे कृषी व पदुम विभागाच्‍या अखत्‍यारीतील आरे रूग्‍णालय आरे मध्‍यवर्ती दुग्धशाळेतील कर्मचारी व परवानाधारक यांच्‍यासाठी राज्‍य शासनाने सन १९६९ सुरू केले. परंतु कालांतराने अपु-या वैद्यकीय सुविधांअभावी या रूग्‍णालयाची दुरावस्‍था होऊन सध्‍या याठिकाणी केवळ बाह्य रूग्‍ण विभाग (ओपीडी) सुरू आहे. सदर रूग्‍णालय राज्‍य शासनाच्‍या दुग्‍ध विकास विभागाकडून आरोग्‍य विभागाकडे हस्‍तांतरीत करण्‍याची प्रक्रिया सुरू आहे.

पर्यावरण मंत्री व मुंबई उपनगर जिल्‍ह्याचे पालकमंत्री ना. आदित्‍य ठाकरे यांच्‍या सूचनेनुसार आरे रूग्‍णालय आयुष्‍य मंत्रालयामार्फत कार्यान्‍वीत करण्‍यासाठी स्‍थानिक शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर व मुंबईच्‍या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ यांनी आज दि. ६ मे रोजी आरोग्‍य मंत्री ना. राजेश टोपे यांची भेट घेऊन चर्चा केली. केंद्र शासनाच्‍या आयुष मंत्रालयाकडून हे रूग्‍णालय सुरू करण्‍यासाठी राज्‍य शासनातर्फे तात्‍काळ प्रस्‍ताव सादर करावा अशी मागणी यावेळी त्‍यांनी केली.

ना. राजेश टोपे यांनी याबाबत तातडीने राज्‍य शासनातर्फे प्रस्‍ताव सादर करण्‍यात येऊन सकारात्‍मक निर्णय घेण्‍यात येईल असे आश्‍वासन दिले. सध्‍याच्‍या कोरोना काळात मुंबईतील रूग्‍णालयांमध्‍ये अपु-या पडत असलेल्‍या खाटांची संख्‍या लक्षात घेता आरे रूग्‍णालय आयुष मार्फत पूर्ण क्षमतेने कार्यान्‍वीत झाल्‍यास गोरेगाव पूर्व परिसरातील हजारो गोर-गरीब रूग्‍णांना त्‍याचा लाभ होणार आहे. याप्रसंगी झालेल्‍या बैठकीत खासदार गजानन कीर्तिकर यांचेसह मुंबईच्‍या माजी महापौर डॉ. शुभा राऊळ, आयुषचे सहाय्यक संचालक डॉ. घोलप, आरेचे प्रतिनियुक्‍तीवरील अधिकारी श्री. पटेल उपस्थित होते.