महाराष्ट्र राज्य स्थापन झाले ते मराठी भाषिक राज्य म्हणून भाषावार प्रांतरचनेनुसार. महाराष्ट्र राज्याची भाषा ही मराठी!
वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील मराठी माणसाला न्याय्य हक्क मिळावा म्हणून शिवसेना पक्षाची स्थापना केली. शिवसेनेची अंगीकृत संघटना स्थानीय लोकाधिकार समिती महासंघ स्थापन केल्यानंतर कै.सुधीरभाऊ जोशी अध्यक्ष होते, त्यानंतर मी अध्यक्ष म्हणून काम केले. केंद्र व राज्य शासनाच्या नोकर भरतीत स्थानिक भुमिपूत्र असलेल्या मराठी युवकांना ८० टक्के प्राधान्य मिळावे यासाठी अनेक आस्थापनांवर उदा. केंद्र सरकारच्या बँका, आयकर खाते, पोस्ट, तेल कंपन्या, एअर इंडिया, मुंबई पोर्ट ट्रस्ट, एल.आय.सी. इत्यादी आस्थापनांमध्ये प्रखर लढा उभारला. वेळप्रसंगी उर्मट अमराठी अधिका-यांना शिवसेना पक्षाच्या पध्दतीने वठणीवर आणले. केंद्र शासनाच्या विविध आस्थापनांमध्ये मुंबईत नोकर भरती होत असताना अनेक परप्रांतीय उमेदवार वशीला लावून परिक्षेला बसण्याचा प्रयत्न करीत होते, अशा अनेक परिक्षा आम्ही उधळून लावल्या, त्याबद्दल आमच्यावर गुन्हे दाखल झाले.
मुंबईतील दुकानांवर मराठी फलक लावण्यात यावा, यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करून आदेश देखील काढण्यात आला. ज्या दुकानांवर मराठी फलक नसेल, त्या फलकांना काळे फासण्याचे काम मुंबईतील शिवसैनिकांनी केले. यासंदर्भात अनेक तक्रारी होऊन माझ्यासह शिवसैनिकांवर खटले देखील दाखल करण्यात आले.
त्रिभाषा सूत्रानुसार अनेक केंद्रीय कार्यालयांवर मराठीचे फलक लावले जात नव्हते, ते लावण्यास भाग पाडले. केंद्रीय आस्थापनांच्या नोकरभरतीच्या जाहिराती मराठी वृत्तपत्रांतून प्रकाशित करण्यास बंधनकारक केले तसेच केंद्रीय कार्यालयांच्या आस्थापनांतील अधिकाऱ्यांच्या नावाची पाटी मराठी भाषेतून लावण्यास भाग पाडले. सर्व विमान कंपन्यांमध्ये व रेल्वेमध्ये मराठी भाषेतून घोषणा देण्यास भाग पाडले. सर्व बँकांमध्ये ग्राहकांना चेक भरणे, पैसे काढण्याची स्लीप भरणे व विविध अर्ज मराठीतून स्वीकारण्यास यश प्राप्त केले. मुंबईतून सुटणा-या सर्व विमानांमध्ये मराठी वृत्तपत्र ठेवण्यास भाग पाडले.
खासदार म्हणून निवडून आल्यावर मराठी भाषेला ‘अभिजात भाषेचा’ दर्जा मिळावा म्हणून विविध आयुधांमार्फत संसदेत सातत्याने आवाज उठवला.
आजमितीपर्यंत मराठीजनांच्या अस्मितेसाठी लढाऊ बाणा घेऊन शिवसेना प्रणित लोकाधिकार समितीने संघर्ष करून कार्य केले. ते आता मराठीजनांच्या मनावर खोलवर रूजले आहे. परंतु शिवसेनाप्रमुखांच्या अवतारकार्याच्या विचारांचा आजच्या शिवसेनेला विसर पडला आहे. जुन्या कढीलाच ऊत आणण्याचे आणि मराठीजनांबद्दल आस्था आहे असे दाखवण्याचे काम आता वृत्तपत्र आणि प्रसारमाध्यमांतून सुरू आहे. प्रत्यक्ष रस्त्यावर कृती केली जात नाही, असे माझे ठाम मत आहे.