Deprecated: mysql_connect(): The mysql extension is deprecated and will be removed in the future: use mysqli or PDO instead in /home/gajanank/public_html/wp-includes/wp-db.php on line 1142
शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे खऱ्या अर्थाने जनतेचे खासदार आहेत. गजाभाऊ म्हणजे खरंतर शिवसेनेचा चेहरा आहेत. – वृत्तमानस | Senior Shivsena Leader Gajanan Kirtikar | Member of Parliament from North West Mumbai

Gajanan Kirtikar

Go to English Version

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे खऱ्या अर्थाने जनतेचे खासदार आहेत. गजाभाऊ म्हणजे खरंतर शिवसेनेचा चेहरा आहेत. – वृत्तमानस

शिवसेनेचे खासदार गजानन कीर्तिकर हे खऱ्या अर्थाने जनतेचे खासदार आहेत. गजाभाऊ म्हणजे खरंतर शिवसेनेचा चेहरा आहेत. लोकप्रतिनीधी किती झपाटून काम करतो, त्या कामातून पक्षसंघटना कशी वाढवितो, हे कीर्तिकर यांच्या प्रचंड कामातून दिसते. त्यांनी लोकांना आपलेसे केले आहे. शिवसेनेची कीर्ती वाढविली आहे.


शिवसेना आता पन्नाशीत पोहचली आहे. आक्रमक आणि लढावू बाणा असलेल्या संघटनेचा जन्मच समाजकार्यासाठी झालाय. पुढे संघटनेचा राजकीय पक्ष झाला, तरी मूळ संकल्पना कधीच मागे पडली नाही. सुवर्ण महोत्सवाच्या निमीत्ताने पुन्हा एकदा समाजकार्यावर भर देण्याची भूमिका पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी घेतली आहे. हे स्वागतार्हच आहे. शिवसेना या शब्दातच प्रखर आंदोलन आहे. गेल्या ४०-५० वर्षात शिवसेनेने खुप मोठी आंदोलनं यशस्वी करुन दाखविली आहेत. ५० वर्षांपूर्वी बांधलेली ही तरुणांची संघटना आजही तरुणांचीच राहीली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी बांधलेली संघटना आणि तिची काम करण्याची पध्दत आणि संघटनात्मक रचना भल्याभल्यांना भुरळ पाडते. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची बांधणी शिवसेनेच्या धर्तीवर असली पाहिजे, असे त्या पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी त्यांच्या नेत्यांना, पदाधिकाऱ्यांना अनेकदा सुचविले, मात्र त्यांची इच्छा अद्याप प्रत्यक्षात आली नाही आणि येण्याची शक्यताही नाही. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एका सत्ताधारी आणि प्रस्थापित पक्षात फूट पाडूनच जन्मास आलाय. शिवसेनेच्या मागे प्रबोधनकारांचा मोठा वारसा होता. ते समाजसुधारक होते, तर बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेच्या माध्यमातून लाखो समाजसेवक निर्माण केले. शिवसैनिक असे त्याचे नामकरण झाले. समाजसेवेलाही एक शिस्त असावी लागते. त्यामुळे समाजसेवकांचा शिवसेनेत सैनिक झाला. याच कार्यकर्त्यांच्या बळावर ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण हे सूत्र शिवसेनेनं मांडले आणि कृतीतून सिध्द केलं. शिवसेनेच्या शाखा-शाखांतून समाजकार्याचं बीज पेरलं गेलं  आणि त्यातून लोकांच्या मदतीला शिवसेना धावली. आजही हेच समाजसेवेचं बाळकडू कार्यकर्त्यांना मिळत असतं. काही अपवाद वगळता शिवसेनेची कार्यालयं समाजसेवेची मंदीरं झाली आहेत. शिवसेना याच समाजकारणातून राजकारणात आली आणि यशस्वी झाली. नगरसेवक, आमदार, खासदार कसा असावा, हे शिवसेनेनं कृतीतून दाखवून दिले. ५० वर्षापूर्वी नगरसेवकांना नगरपिता  नव्हे नगरसेवक बिरुदावली दिली. आज आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही स्वतःला प्रधानसेवक म्हणवून घेतात. समाजसेवा आणि समाजकार्य म्हणजे काय हे शिवसेनेने महाराष्ट्राला दाखवून दिले आणि त्याच वाटेवरुन काही राजकीय पक्षांची वाटचाल सुरु आहे. सेनेमुळे अन्य राजकीय पक्ष त्यानंतर समाजकार्यात दिसू लागले. लोकांपुढे जाऊ लागले. लोकांसाठी शिवसेना आहे. लोकांच्या मदतीला, लोकांच्या अडीअडचणींना कार्यकर्त्यांनी धावून गेले पाहिजे, असा पायंडाच बाळासाहेबांनी पाडला. लोकांचे अश्रू पुसा, त्यांचे आशिर्वाद घ्या, असा आदेशच त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. त्याप्रमाणे सेनेचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधी भागाभागात काम करु लागले. शाखा-शाखा लोकांचा आधार बनल्या. लोकांची कामे करण्याचा निर्धार झाला आणि याच सेवेच्या माध्यमातून कार्यकर्ते नगरसेवक, आमदार झाले.

कार्य अहवालातून लेखाजोखा

समाजकार्याची किंवा लोकसेवेची केवळ घोषणा नको, तर केलेल्या कामाचा लेखाजोखा कार्य अहवालाच्या माध्यमातून दिला गेला पाहिजे, असा दंडकही बाळासाहेबांनीच घालून दिला. पदं घेऊन उबवू नका, तर लोकांची कामे करा, लोकांचे प्रश्न सोडवा आणि केलेल्या कामाचा अहवाल प्रसिध्द करा, असे सक्त आदेशही त्यांनी दिले. त्यामुळेच प्रामाणिक पदाधिकारी आणि लोकप्रतिनीधी त्याचे कार्य अहवाल लोकांना देत असतात. केलेल्या कामाचे श्रेय घेण्यात काहीही गैर नाही. केलेली कामे, मार्गी लावलेली कामे आणि पाठपुरावा करीत असलेली कामे याबाबत लोकांना अहवालातून खऱ्या अर्थाने  माहिती मिळू लागली. कार्य अहवाल म्हणजे लोकप्रतिनीधींचा जणू आरसाच आहे.

 लोकप्रतिनीधी असावा कीर्तिकरांसारखा

शिवसेना नेते गजानन कीर्तिकर म्हणजे शिवसेनेचा चेहरा आहे. ते २० वर्षे आमदार होते. साडेचार वर्षे गृहराज्यमंत्री होते. मागच्या लोकसभा निवडणूकीत त्यांचा चटका लावणारा पराभव झाला होता, मात्र पराभव विसरुन दुसऱ्या दिवशी ते पुन्हा जोमाने कामाला लागले. त्यांचे काम तर कधीच बंद नव्हते. पदावर असो की नसो त्यांचा दरबार कायम भरलेलाच असायचा. त्यामुळेच कीर्तिकर लोकांपासून कधीच दूर नव्हते. यावेळी त्यांनी मागचा पराभव धुवून काढला आणि दणदणीत यश मिळविले. काम करणाऱ्या माणसाला शेवटी अधिकार लागतोच. त्यांमुळे खासदार होतोच. त्यांनी लोकांच्या कामांचा सपाटाच लावला. गेल्या वर्षभरातील कामांचा अहवाल त्यांनी नुकताच पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना सादर केला आणि केलेली भरपूर कामे आणि करावयाच्या कामांची जंत्री वाचून उद्धव ठाकरेही खुष झाले. जर आधीचा खासदार निष्क्रिय ठरला असेल, तर नव्या खासदारावर मोठा ताण येतोच. कीर्तिकरांचेही तेच झाले. कामत निष्क्रिय ठरल्यानेच त्यांच्यावर कामाचा मोठा बोजा आलाच, पण शांत बसतील ते कीर्तिकर नव्हेत. मतदारसंघातील कोळी बांधवांचे प्रश्न असोत की जुहू-सातबंगला चौपाटीचे सुशोभिकरण असो, आंबोली फाटक असो की म्हाडा कॉलनीच्या पाण्याची समस्या असो, नागरी निवारा प्रकल्पाचे करारनामे असोत, प्रत्येक कामात लक्ष घालून ती कामे कीर्तिकरांनी थोड्याच अवधित करुन दाखविली, तर ओशिवरा रेल्वे स्थानक, अंधेरी-गोरेगाव हार्बर लाईन, वांद्रे-बोरीवलीचा सहावा रेल्वेमार्ग, मालाड, गोरेगाव, अंधेरी येथील रेल्वेचे पादचारी पुलांची दुरुस्ती, रेल्वे फलाटांची उंची वाढविणे आदी महत्वाच्या कामांचा सातत्याने पाठपुरावा चालविला आहे. मुंबईचे महत्व कमी होऊ नये म्हणून विविध कार्यालये, मुंबई पोर्ट, एअर इंडिया कार्यालय अशी महत्वाची कार्यालये मुंबईतच असली पाहिजेत, यासाठी कीर्तिकर यांनी थेट पंतप्रधानांपर्यंत पाठपुरावा चालू ठेवला आहे. मतदारसंघातील छोटी-मोठी कामे तर प्रचंड प्रमाणावर केली आहेत. माझगाव डॉक, सेंट्रल बँक, टपाल विभाग,एअर इंडिया यातील नोकरभरतीवरचा अन्याय कीर्तिकर यांनी दूर केला. लोकसभेतही कीर्तिकर यांनी शिवसेनेचा आवाज उठविला आहे. तारांकित आणि अतारांकित प्रश्न विचारले. विविध १७ विषयांवर त्यांनी चर्चेत सहभाग घेतला. लोकसभेतील ७८ टक्के उपस्थिती त्यांची होती. मतदारसंघातील हजारो कामे त्यांनी केली. तेवढीच मार्गी लावली. येणाऱ्या प्रत्येकाला दिलासा देणे हा कीर्तिकरांचा स्वभावच आहे.

आरोग्य, शैक्षणिक, कृषी आवास योजना, ग्रामीण पेयजल योजना, महिला बचतगट ते पायवाटा, समाजगृह, वाचनालये, स्वच्छतागृहे, विकास आराखड्यातील सूचना आणि हरकती ते स्थानिक नागरीकांच्या मदतीसाठी पोलिस अधिकारी, सरकारी अधिकारी आणि महापालिकेचे अधिकारी यांच्याशी संवाद तर कायम असतोच. विभागातील नागरीकांची कामे, त्यांचे प्रश्न, अडल्या नडल्यांना मदतीचा हात आणि सर्वांना सहकार्य करण्याची भावना या स्वभावामुळे गजानन कीर्तिकर हे लोकांचे नेते, लोकांचे खासदार आहेत. शिवसेनेचा प्रत्येक खासदार लोकांसाठी राबला, त्यांना उपयोगी पडला, तर स्वबळाचे स्वप्न साकार होण्यात कोणताही अडथळा येणार नाही. कीर्तिकर आज लोकांचे भाऊ म्हणूनच प्रसिध्द आहेत. त्यांनी विभागात, मुंबईत, राज्यात आणि आता दिल्लीतही शिवसेनेची कीर्ती नक्कीच वाढविली आहे. खासदार असा असावा.

जनमानस
विलास मुकादम – ९३२४०८३८७२

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL