Gajanan Kirtikar

Go to English Version

शिवसेनाप्रमुखांना भगवा सलाम!

balasaheb-bg

शिवसेनाप्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणजे मराठी माणसाचे मानबिंदू, शिवसैनिकांचे सरसेनापती, समस्त हिंदूंचे आशास्थान, हिंदुहृदयसम्राट, शिवसेना या महामंत्राचे जनक अशा या लढावू संघटनेचे गेली ४६ वर्षे त्यांनी नेतृत्व केले. शिवसेनेच्या स्थापनेपासूनचा मी शिवसैनिक. शिवसैनिक ते आमदार-मंत्री-खासदार आणि शिवसेना नेता असा माझा राजकीय प्रवास घडविणाऱ्या बाळासाहेबांच्या सहवासाचे भाग्य मला लाभले. त्यांचा मोकळा स्वभाव, निर्णय घेण्याची धाडसी वृत्ती, स्पष्टवक्तेपणा, शिवसैनिकांवरचे अलोट प्रेम आणि शिवसेना नेते, पदाधिकाऱ्यांवरचा विश्वास यामुळेच त्यांनी शिवसेनेसारख्या लढावू आणि आक्रमक संघटनेचे नेतृत्व ४६ वर्षे यशस्वीरित्या सांभाळले. देशात एवढे दिर्घकाळ एखाद्या राजकीय पक्षाचे नेतृत्व कुठल्याही राजकीय नेत्याने केलेले मी पाहिले नाही.

मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून मिळाला खरा, परंतु मुंबईतील मराठी माणसांची आर्थिक परिस्थिती दयनीयच होती. दाक्षिणात्यांची टोळधाड मुंबईतील मराठी माणसांच्या नोकऱ्या हिरावून घेत होते. मी गिरगावात लहानाचा मोठा झालो. तरुणपणीच बाळासाहेबांच्या विचारांनी मी भारावून गेलो आणि स्थानिकांच्या, भुमिपुत्रांच्या हक्कासाठी लढण्यास सज्ज झालो. १९६०च्या उत्तरार्धात बाळासाहेबांच्या ‘कुंचले आणि पलिते’ यांनी मुंबई-महाराष्ट्रातील मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाची जाण मराठी तरुणांना करुन दिली. त्याचे स्फुल्लिंग चेतविले, मने पेटविली आणि मराठी तरुण जागा झाला. तो अन्यायाविरुध्द लढू लागला. मराठी तरुणांना त्याचा हक्काचे स्थान व मानाचे पान मिळविण्यासाठी संघर्ष केला, त्या लढ्यात अनेक मराठी तरुण सामील झाले, त्यापैकीच मी एक होतो.

महाराष्ट्राच्या राजधानीत मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायामुळे मी बैचेन होत असे. त्याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’मधून मराठी माणसांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडीत होते. ‘वाचा आणि थंड बसा’ या मथळ्याखाली वेगवेगळ्या आस्थापनांतील नोकरभरतीमधील दाक्षिणात्यांच्या दादागिरीबद्दल लिहीले जायचे. त्याबरोबर तिथे नोकरी करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची यादीही प्रसिध्द केली जायची. त्या यादीतील दाक्षिणात्यांचे प्राबल्य आणि अधिकारी पदावरील त्यांचे आक्रमण पाहून मन पेटून उठे. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मराठीजनांनी एकत्र यावे, या बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे मनापासून वाटू लागले. त्यावेळी दादर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पर्ल सेंटरमध्ये शिवसेनेचे मुख्य कार्यालय होते. तिथे माझे येणे-जाणे सुरु झाले. शिवसेनेसाठी सर्वस्व झोकून देण्याची मनाची तयारी झाली. शिवतिर्थावर बाळासाहेबांच्या मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत जाताना पराकोटीचा आनंद मिळायचा. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन मी शिवसेनेकडे आकर्षिक झालो आणि स्थापनेपासून म्हणजेच १९६६ पासून मी शिवसैनिक झाले आणि त्याच प्रेरणेने रिझर्व बॅंकेमध्ये भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य मिळवून देणाऱ्या लोकाधिकार चळवळीत मी सहभागी झालो.

मी रिझर्व बॅंकेत कामास लागलो तेव्हा रिझर्व बॅंकेतील मराठी माणसांची संख्या नगण्य होती. दाक्षिणात्य कर्मचारी बहुसंख्येने होते. कर्मचारी नेतेही दाक्षिणात्य होते व उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्येही दाक्षिणात्यांचाच वरचष्मा होता. यामुळे चहुबाजूंनी मराठी माणूस पिचला जात होता. या पिचक्या कण्याला एकच व्यक्ती शक्ती देऊ शकत होती, ती म्हणजे बाळासाहेब ठाकरे. १९७६ साली रिझर्व बॅंकेत ८०० जणांची भरती होणार होती. दाक्षिणात्यांचा त्यांच्याच भाईबंदांना घ्यायचा विचार सुरु होता, त्यासाठी ते प्रयत्नशीलही होते. त्यावेळेस शिवतीर्थावरील शिवसेनेचा दसरा मेळावा फक्त आठ दिवसांवर येऊन ठेपला होता. तेव्हा आम्हाला वाटले की, माननीय बाळासाहेबांनी दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात रिझर्व बँकेतील मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडावी. रिझर्व बँकेच्या दाक्षिणात्य मुजोर व्यवस्थापनाला इशारा द्यावा. हे बाळासाहेबांना सांगण्यासाठी रामराय वळंजू, सुर्यकांत महाडिक, अरुण जोशी आणि मी त्यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ येथे गेलो. त्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांनी रिझर्व बँकेवर बुलंद तोफ डागली आणि नोकरभरतीत मराठी माणसांना न्याय मिळाला. लोकाधिकार चळवळीची हीच खरी पहिली ठिणगी पडली आणि मराठी माणसाच्या न्याय्य हक्काच्या लढ्याला शिवसेनाप्रणित लोकाधिकारच्या संघर्षाला प्रारंभ झाला.

बाळासाहेब सुरुवातीला जेव्हा मराठी अस्मितेसाठी लढत होते, तेव्हा काही मराठी माणसे व वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे नेते, पत्रकार, विचारवंत त्यांच्या विरोधात होते. बाळासाहेबांच्या बाजूने त्यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे, त्यांची स्वतःची हिंमत, मराठी जनतेबद्दलचा जाज्वल्य अभिमान व त्यांचा समर्थ कुंचला एवढीच शक्तीस्थाने होती. पण त्यानंतर बाळासाहेबांना आणखी एक शस्त्र गवसले, त्यांची बुलंद वाणी. त्यामुळे पाहता पाहता बाळासाहेब मराठी माणसाच्या गळ्यातील ताईत होऊन बसले. आपल्या मायभूमीत लाचारीने किंवा दीनवाणपणे राहण्याचे कारण काय? असा खडा सवाल करीत बाळासाहेबांनी कणा ताठ ठेवून वागण्याचा, जगण्याचा विचार सर्वसाधारण मराठी माणसांच्या मनामध्ये पेरला आणि त्यामुळेच त्यांच्यावर जीवापाड प्रेम करणाऱ्या असंख्य शिवसैनिकांचे सैन्य त्यांना लाभले.

महाराष्ट्रातील छोट्या-छोट्या जाती व उपेक्षित लोक बाळासाहेबांनी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन शिवसेनेच्या भगव्या झेंड्याखाली एकवटले. शिवसेनेत आलेल्या शिवसैनिकाची जात शिवसेनाप्रमुखांनी कधीच विचारली नाही. ‘ब्राह्मण-ब्राह्मणेतर, मराठा-मराठेतर, घाटी-कोकणी, स्पृश्य-अस्पृश्य’ असे सारे भेदभाव गाडून मराठी म्हणून एकत्र यावे, असे आवाहन सुरुवातीपासूनच बाळासाहेबांनी केले आणि त्याला महाराष्ट्रातील बहुजन समाजाने प्रचंड प्रतिसाद दिला. त्यामुळे जातीपातीचे राजकारण करणाऱ्या पक्षांचे धाबे दणाणले. शिवसेनेचा पसारा वाढत गेला आणि पुढे १९९५च्या विधानसभा निवडणूकीत शिवसेना-भाजप युतीचे सरकार महाराष्ट्रात आले. खऱ्या अर्थाने बहुजन समाजाचे सरकार आले.

हिंदुस्थानमध्ये हिंदुत्वाच्या चळवळीने विसाव्या शतकातील तिसऱ्या दशकापासून जोर धरला होता. तरीही हिंदुत्वाचा विचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहचला तो फक्त बाळासाहेबांमुळेच! हे सत्य कुणीही नाकारु शकणार नाही. मुंबईची दंगल असो, भिवंडीची दंगल असो, मालेगावची दंगल असो प्रत्येक ठिकाणी हिंदू मार खात होता. त्या हिंदूंना दिलासा दिला तो बाळासाहेबांनीच. कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता, स्पष्ट ते बोलणारे बाळासाहेब हे एकमेव नेते होते. ते बोलतानाच विचार करत, विचार करुनच बोलत आणि नंतरही ठाम राहत. आजच्या काळात असे दुर्मिळ राजकारणी म्हणूनच बाळासाहेब इतरांपेक्षा वेगळे होते. ही हिंमत त्यांना प्रबोधनकारांनी दिली. प्रबोधनकारांच्या समाजसुधारकाचा वसा त्यांनी घेतला आणि पुढे चालू ठेवला. त्यांनी शाहु-फुले-आंबेडकर यांची जपमाळ ओढली नाही, तर जातपात विरहीत संघटना त्यांनी चालविली. संघटनेत जात-पात कधीही मानली नाही. त्यामुळे सामान्यातला सामान्य सैनिक आमदार, खासदार झाला. महाराष्ट्राला मनोहर जोशींच्या रुपाने पहिला ब्राह्मण मुख्यमंत्री लाभला. शिवसेना-भाजप युतीचे ते जसे शिल्पकार होते तसे शिवशक्ती-भिमशक्तीचेही तेच शिल्पकार होते. महाराष्ट्राला लोकोत्तर वक्त्यांची परंपरा लाभली आहे. लोकमान्य टिळकांपासून आचार्य अत्र्यांपर्यंत एका प्रदीर्घ काळाता महाराष्ट्राने प्रभावी व्यक्त्यांची एक मालिकाच पाहिली. वकृत्वविश्वात टिळकयुग आणि अत्रे युगानंतर ठाकरेयुग अवतरले. समोर लाखोंचा जनसमुदाय बसलेला आहे आणि व्यासपिठावर बाळासाहेब आपल्या खणखणीत आवाजात श्रोत्यांना कधी हसवीत, कधी रडवीत, कधी चिडवीत, तर कधी समजावीत आपला विचार पटवून देत आणि म्हणून आजतरी महाराष्ट्रात बाळासाहेबांच्या तोडीचा वक्ता नाही. म्हणून मराठी माणसांसाठी बाळासाहेबांचे भाषण हा एक अनमोल ठेवा आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या व्यक्तिमत्वाला इंद्रधनुष्याचे सात रंग आहेत. मार्मिक व्यंगचित्रकार, कुशल संघटक, प्रभावी वक्ते, जागृत पत्रकार, सहृदयी विचारवंत असे अनेक रंग लाखो लोकांनी गेल्या पन्नास वर्षात पाहिले. बाळासाहेबांकडे ‘पोटात एक आणि ओठात एक’ अशी भानगड नव्हती. आवाजात ‘दरारा’ होता पण ‘दर्प’ नव्हता. त्यामुळेच बाळासाहेबांनी घातलेली हाक हृदयाला भिडते. बहुसंख्य पुढारी भित्रे असतात. ते मी बोललोच नव्हतो असे म्हणून आपली विधाने फिरवतात. पण बाळासाहेब खऱ्या अर्थाने ‘मर्दमराठा’ होते. कारण विधानाची फिरवा-फिरवी करण्याची त्यांना कधी गरजच भासली नाही. त्याउलट “होय! मी बोललो, पुढे काय?” असे विरोधकांना, आरोप करणाऱ्यांना ठणकावून विचारत. यालाच ‘ठाकरी बाणा’ म्हणतात. ‘बाळासाहेब ठाकरे’ या आठ अक्षरात सुर्याचे प्रखर तेज सामावलेले आहे. प्रखर राष्ट्रनिष्ठा त्यांचा स्वभावधर्म असल्यामुळे लक्षावधी मराठी माणसांचे, हिंदूंचे ते श्रध्दास्थान आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हितासाठी विरोधकांशी मुकाबला करणारे ते सरसेनापती होते. म्हणूनच बाळासाहेब एकच वाघ होते हे मराठी आणि हिंदू समाज जाणतो. त्या शिवसेनाप्रमुखांना भगवा सलाम!

बाळासाहेबांचे ‘हिंदुत्व’ हे सर्वच मुसलमानांच्या विरोधातले नव्हते. जे जात्यंध मुसलमान आहेत, राष्ट्रद्रोही मुसलमान आहेत त्यांच्या विरोधात बाळासाहेब होते. जाणव्यातले हिंदुत्व त्यांना कदापि मान्य नव्हते. त्यांना विज्ञाननिष्ठ हिंदुत्व हवे होते, त्यांच्या मते हिंदुत्व ही देशाची विचारधारा आहे आणि हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व! म्हणूनच ते लाखो हिंदुंचे लाडके ‘हिंदुहृदयसम्राट’ झाले. बाळासाहेबांची महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारण-समाजकारणावर करडी नजर असे. शिवसेनेच्या नेते-पदाधिकाऱ्यांपासून शिवसैनिकांपर्यंत, प्रत्येकाची त्यांना खडान् खडा माहिती होती. ‘सामना’च्या माध्यमातून ते तमाम मराठी जनतेशी संवाद साधत असत. बंगल्यावर आलेल्या नेत्या-कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी शिवसेनेला जो आकार दिला, एक पोलादी संघटना उभी करण्याचे जे कौशल्य दाखविले, त्याला तोड नाही. त्यांच्याकडून प्रेरणा घेऊनच शिवसेनेतून जे अनेक एकलव्य तयार झाले त्यापैकींच मी एक आहे आणि त्याचा मला सार्थ अभिमान आहे. बाळासाहेबांच्या नेतृत्वाचा वारसा उद्धवजी चालवित आहे याचा आम्हा शिवसैनिकांना अभिमान आहे आणि म्हणूनच अभिमानाने सांगतो की, उद्धवजींच्या मागे एकदिलाने, एकनिष्ठेने आणि एकजुटीने उभे राहून बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण करु!

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL