Gajanan Kirtikar

Go to English Version

गोरेगाव पश्चिम व जोगेश्वरी पूर्व येथील पोस्ट ऑफिस समस्यांचे निराकरण

goregaon-post-office-inspection

मोतिलाल नगर क्र १, गोरेगाव पश्चिम येथे सन १९९५ साली तीन मजली पोस्ट ऑफिस इमारत बांधण्यात आली. ९४ कर्मचारी व विविध योजनांचे ४७ एजंट येथे कार्यरत आहेत. पेन्शन, दैनंदिन पोस्टाचे कामकाज याकरिता सरासरी २ हजार नागरिक या पोस्ट ऑफिसला दररोज भेट देत असतात. अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करण्यात आले व दैनंदिन देखभालही केली जात नाही. दि. ३ सप्टेबर २०१४ रोजी येथील स्लॅब कोसळ्यामुळे मुंबई महानगरपालिका अग्निशामक दलाला पाचारण करून इमारतीची पडताळणी केली व मंबई महानगरपालिकाने सदर इमारत रिक्त करण्याचे आदेश दिले आहेत. दि. ४ सप्टेंबर पासून आजमितीपर्यंत सर्व कामकाज ठप्प झाले आहे. विविध पत्रांचे गठ्ठे पडून आहेत नागरिकांना पेन्शन देखील मिळालेले नाही.

सदर समस्येबाबत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ दि. ८ रोजी पाहणी दौरा आयोजित केला. त्यावेळी त्याचेसमवेत आमदार सुभाष देसाई, माजी नगरसेवक दिलीप शिंदे, उपविभाग प्रमुख अजय नाईक, पोस्ट मास्तर जनरल एच. सी. अगरवाल, मालमत्ता विभागाचे आर. व्ही. कुलकर्णी व इतर प्रमुख अधिकारी यांचेसह विभागातील असंख्य जेष्ठ नागरिक देखील उपस्थित होते.

आयआयटी ,व्हीजेटीआय यासारख्या नामांकित संस्थाकडून इमारतीची तपासणी करून घ्यावी. इमारत दुरुस्त करण्यास योग्य आहे किवा पाडून नवीन बांधावयास लागेल याबाबत अहवाल घेण्याचे निश्चित करण्यात आले. तसेच या पोस्ट ऑफिस लगत वाघरी मंडळ या संस्थेचा जो हॉल आहे, तेथे तात्पुरता स्वरुपात तात्काळ पोस्ट ऑफिस चालू करण्यात येईल असे श्री. अगरवाल यांनी आश्वासन दिले. तसेच या विभागात अनेक पोस्टाचे भूखंड आहेत तेदेखील ताब्यात घ्यावे अशी मागणी आमदार सुभाष देसाई व खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली.

जोगेश्वरी पोस्ट ऑफिस जून २०१४ मध्ये शर्मा इस्टेट, गोरेगाव पूर्व या पोस्ट ऑफिस इमारतीमध्ये तात्पुरता स्वरुपात स्थलांतरीत करण्यात आले आहे. जोगेश्वरी पूर्व येथील पोस्ट ऑफिसची इमारत ही भाडेतत्वावर आहे. सदर इमारत मोडकळीस आल्यामुळे तातडीने रिक्त करण्याचे आदेश मुंबई महानगरपालिकेने दिले. या इमारतीच्या मालकाचे निधन झाल्यामुळे त्यांचा वारसांबाबत वाद चालू आहे व ते कोणत्याही प्रकारची इमारत दुरुस्ती करीत नाहीत. म्हणून पोस्ट ऑफिस रिक्त करण्यात आले आहे. जून महिण्यापासून शर्मा इस्टेट या अतिदुर्गम विभागात जेष्ठ नागरिकांना पेन्शनसाठी जावे लागते.रिक्षासाठी ५० रुपये भाडे भरावे लागते.बसची कोणतीही सोय नाही कारण रस्ताच अस्तित्वात नाही. तसेच गोरेगाव रेल्वे स्थानकापासून देखील शर्मा इस्टेट अतिशय दूर अंतरावर आहे.

सदर समस्येबाबत शिवसेना खासदार गजानन कीर्तिकर यांनी पोस्ट खात्याच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून तात्काळ दि. ८ रोजी पाहणी दौरा आयोजित केला. त्यावेळी त्यांचेसमवेत आमदार रविंद्र वायकर नगरसेवक बाळा नर, सुधार समिती अध्यक्षा उज्जवला मोडक, उप विभागप्रमुख विश्वनाथ सावंत, शाखाप्रमुख अमर मालवणकर, सौ. दिपाशा पवार, पोस्ट मास्तर जनरल एच. सी. अगरवाल, मालमत्ता विभागाचे आर.व्ही. कुलकर्णी व इतर प्रमुख अधिकारी यांचेसह विभागातील असंख्य ज्येष्ठ नागरिक देखील उपस्थित होते.

नटवर नगर जोगेश्वरी पूर्व येथे मुंबई महानगरपालिकेच्या दोन शाळा आहेत तसेच इस्माईल युसूफ महाविद्यालयाच्या आवारात मोठा हॉल रिक्त आहे. तातडीने पोस्ट ऑफिस स्थलांतरीत करण्यात यावे अशी मागणी खासदार गजानन कीर्तिकर यांनी केली.

मेघवाडी पोलीस ठाणेलगत पोस्ट ऑफिसची इमारत तयार आहे. परंतू ताबा घेण्यासाठी पोस्ट विभागाने अक्षम्य दिरंगाई केली असल्याचे आमदार रविंद्र वायकर यांनी निदर्शनास आणले. श्री. अगरवाल यांनी सदर इमारत तात्काळ ताब्यात घेण्याची कार्यवाही करण्यात येईल अन्यथा महानगरपालिकेकडे पाठपुरावा करुन उपलब्ध शाळेत पोस्ट ऑफिस चालू करण्यात येईल असे आश्वासन दिले.

कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ दिवसांत मोतीलाल नगर व जोगेश्वरी पूर्व येथील पोस्ट ऑफिस समस्यांचे निराकरण झाल्याच पाहिजे असे आदेश खासदार गजानन कीर्तिकर यांनी संबंधित पोस्ट अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL