Gajanan Kirtikar

Go to English Version

पराजयाचं विजयात रुपांतर करुनच उत्तर द्यायचयं!

कलमनामा या साप्ताहिकामध्ये शिवसेना-भाजप-रिपाईं महायुतीचे उमेदवार श्री. गजानन कीर्तिकर यांची मुलाखत राकेश शिर्के यांनी रणधुमाळी सदराअंतर्गत घेतली. ती मुलाखत जशीच्या तशी इथे देत आहे.

gajanankirtikar

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पश्चात ही पहिलीच निवडणूक आहे. या निवडणकीला सामोरं जाताना काय भावना व्यक्त कराल?
बाळासाहेबांच्या पश्चात आलेल्या या निवडणूकीला सामोरं जाताना बाळासाहेबांच्या ज्या स्मृती आहेत त्या आमच्यासारख्यांच्या आणि शिवसैनिकांच्या मनात फार प्रबळ आहेत. त्यांच शिवसैनिकांना सातत्यानं होणारं मार्गदर्शन आता ते आमच्यात नसल्याने होत नाही. मात्र त्यांनी सांगितलेल्या अनेक गोष्टी आजही आमच्या मनात तरळत आहेत. 2014 च्या निवडणूकीत सबंध राज्यात आणि देशात बदल घडवून आणण्याचं जे बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे ते शिवसैनिकांच्या मनात बिंबलेलं आहे. हा फार मोठा फायदा मला या निवडणूकीत पहायला मिळतोय.

बाळासाहेबांनंतर जी पक्षबांधणी झालेली आहे ती कशी आहे?
पक्षाची बांधणी बाळासाहेब जेव्हा हयात होते त्यावेळी उद्धवजींनी साहेबांना मदत करण्यासाठी जी कामगिरी सुरु केली आणि त्यानंतर बाळासाहेब हयात असतानाच त्यांनी उद्धवजींची शिवसेना कार्यप्रमुख म्हणून नेमणूक केली. त्यामुळे पक्षबांधणीचा हा जो विषय आहे तो उद्धवजी हाताळत होते. साहेबांकडून संमती घेऊन नेमणूका जाहिर करणं, त्यात बदल करणं या सगळ्या गोष्टी ते करतच होते. म्हणूनच या कामात उद्धवजींचा हातखंडा झालाय. महाराष्ट्रातील प्रत्येक पदाधिकारी त्यांना नावानिशी माहित आहे. पदाधिकाऱ्याचं व्यक्तिमत्व, त्याची कार्यपध्दती सगळं उद्धवजींना माहित आहे. त्यामुळे त्यांना अचूक निर्णय घेता येतो. उद्धवजींच्या कार्यपध्दतीचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे ते चांगल्या तऱ्हेचा पडताळा घेतात, चाचपणी करतात आणि नंतर मग निर्णय घेतात. कुठलीही चुक होणार नाही याची काळजी घेतात. आताही उमेदवार निवडीवरही त्यांनी पाच ते सहा महिने प्रचंड मेहनत घेतली. सर्व पातळीवरील शिवसैनिक, सामाजिक संस्था इथल्या लोकांशी बोलून, भेटून निर्णय घेतले आहेत.

या निवडणूकीत तुमचे प्रचाराचे मुद्दे कोणते आहेत?
काँग्रेसमुक्त भारत करायचा, महागीमुक्त, भ्रष्ट्राचारमुक्त भारत निर्माण करणे हे प्रमुख मुद्दे आहेत. पण या विषयांमुळे भारतीय जनतेला जे चटके बसताहेत त्यातून जनतेची सुटका करणं हाही एक महत्वाचा मुद्दा आमच्यासाठी आहे. कारण लोकशाहीत जर पुन्हा असेच लोकं बसू लागले तर मग लोकशाही तंत्रपध्दतीचा उपयोग काय? बदल करण्याची वेळ आता आलेली आहे. आणि जर भारतीय जनतेने बदल नाही केला तर भविष्यात कधीच होणार नाही. आणि मग जे आमचे बाळासाहेब सांगून गेले की,… तर देशाची अराजकतेकडे वाटचाल होणार. तसंचं घडेल. त्यामुळे बिगर काँग्रेसी विचारी लोक तरी बदलाचा विचार करतील असं मला वाटतयं.

या निवडणूकीत प्रतिस्पर्धी उमेदवारांचं आव्हान वाटतयं का? कोणत्या उमेदवाराचं आव्हान वाटतंय? का वाटतंय?
निवडणूकीत प्रतिस्पर्धी जो असतो तो आव्हान देतच असतो. त्यामुळे आव्हान वाटणं न वाटणं हा मुद्दाच नाही. पण तरीही माझी लढत जी आहे ती गुरुदास कामत यांच्यासोबत… माझी लढत ‘आप’च्या मयांक गांधी यांच्याबरोबर नाही किंवा मनसेच्या महेश मांजरेकरसोबत नाही. गुरुदास कामत हे विद्यमान खासदार आहेत. २००९ च्या निवडणूकीत माझ्या विरुध्द विजयी झालेत. गेल्या पाच वर्षातील त्यांचा कार्यकाळ या भागातील मतदारांच्या समोर आहे. केंद्र शासनाकरवी इथल्या जनतेचे त्यांनी किती प्रश्न सोडवले? त्यांनी इथल्या जनतेशी किती संपर्क ठेवला आणि त्यांनी इकडे होणाऱ्या आपत्कालिन घटनांसाठी किती वेळा धाव घेतली? हा सगळा लेखाजोखा कामतांनी जनतेला सांगावा… २००९ साली मी हरलो आणि जेव्हा मी हरलो तो पराजय विजयात रुपांतर करूनच उत्तर द्यायचं आणि त्याच दृष्टीने मी तेव्हापासून कामाला लागलोय. मी सातत्याने माझ्या मतदारसंघाच्या संपर्कात राहीलो. सार्वजनिक, सामाजिक कामांमध्ये मी सहभागी होत राहिलो. आपत्कालिन घटना या मतदारसंघात होत असताना त्या ठिकाणी मी उपस्थित राहत होतो. आणि माझ्या मतदारसंघातील नागरिकांना आणि मुंबईवासियांना मी खासदार झालो तर काय दिले पाहिजे, याचा विचार करू लागलो. त्यामुळे माझी या मतदारसंघावरील मांड पक्की आहे. या मतदारसंघासाठी, मुंबईसाठी खासदार म्हणून काय करायला पाहिजे याची चांगली जाण मला झालेली आहे.

तुम्ही आमदार होतात, राज्यमंत्रीही होतात. त्यामुळे आता दिल्लीत जाऊन कोणत्या समस्या मांडणार आहात?
दिल्लीशी संबंधित केंद्रीय कार्यालये असतात. विशेषतः रेल्वे. या रेल्वेचं दरवर्षी बजेट जाहिर होतं. या बजेटमध्ये नवीन नवीन रेल्वे रुळ टाकण्यासाठी, नवीन रेल्वेस्थानकं बांधण्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद केलेली असते. यामुळे प्रत्येक खासदार तो फंड आपल्याकडे वळविण्यासाठी प्रयत्न करत असतो. असं असताना मुंबई उपनगरी रेल्वेची काय परिस्थिती आहे? आम्हाला अत्याधुनिक रेल्वे स्टेशन नको… पण ज्या मुलभूत सुविधा आहेत त्या तरी मिळाल्या पाहिजेत की नको? म्हणजे स्वच्छ रेल्वेस्टेशन, शौचालयं हवीत, रेल्वे अपघात होतात त्यासाठी वैद्यकीय यंत्रणा हवी, साधं स्ट्रेचरही नसतं. ते असलं तर मग कुली नसतों. रेल्वेस्थानकाजवळ रुग्णवाहीका हवी, डॉक्टर, नर्स हवेत. यातलं काहीच नाही आजही. रेल्वेच्या पादचारी पुलाचं ऑडीट झालंय का? एमयुटीपी २ यांनी वांद्र्यापासून बोरिवलीपर्यंत सहावी लाईन टाकण्याचा प्रस्ताव आणलाय. त्या लाईनचं काय झालं? यासाठी फंड का मिळत नाही? त्यानंतर हार्बर लाईनचा मुद्दा आहे. ती आता अंधेरीपर्यंत येते, पण ती गोरेगांवपर्यंत आणायची होती. ती का अद्याप आली नाही? जोगेश्वरी-गोरेगांव दरम्यान ओशिवरा हे नविन रेल्वे स्थानक सुरु करणार होते. ते का नाही अजून झाले? ही सारी कामं रखडली आहेत ती फंड नाही म्हणून. २००६ पासूनची ही कामं आहेत. २००९ च्या निवडणूकीत गुरुदास कामत खासदार झाले. का नाही अद्यापही त्यांनी ही कामं पुर्ण केली? ही खासदाराची कामं आहेत.

दुसरं म्हणजे, मुंबईतील जे कोळीवाडे आहेत. त्या ठिकाणी पालिकेने त्यांना २.५ चटईक्षेत्र दिलेलं आहे. पण ते सीआरझेडमुळे नियमित करू शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये हे केलं गेलेलं आहे. पण मुंबईतच का होत नाही? समुद्रकिनारी कोळी वस्ती असते. पण समुद्र किनारी गाळ साचला असेल तर त्यांना लाँच अँकरिंग करता येत नाही. त्यासाठी त्यांना लांब जाऊन किल्ल्याजवळ अँकरिंग करावं लागतं. हा साधा प्रश्नही विद्यमान खासदाराने सोडवलेला नाही. मुंबईतील पोस्टल सेवा पुर्णपणे कोलमडलेली आहे. ही सेवा फार आवश्यक आहे. एकीकडे खाजगी कुरिअर कंपन्या बलाढ्य झालेल्या आहेत तर दुसरीकडे हे टपालखाते डबघाईला आलेलं आहे. ते आधुनिक झालं पाहिजे तेही काम झालेलं नाही. मुंबईच्या लोकसंख्येच्यानुसार इथे पोस्ट ऑफिस कमी आहेत. याचं कारण भयानक आहे. पोस्ट ऑफिस खरेदी करण्यासाठी जे दरपत्रक आहे ते पुरातन आहे. म्हणजे एखाद्या ठिकाणी १५ हजार रुपयांचा दर असेल आणि दरपत्रकात मात्र ७ हजार रुपये दर असेल तरच विकत घ्या असं लिहीलेल असेल तर हे दरपत्रक सुधारित करायला नको का? कॉम्प्लेक्स उभे राहू शकतात पण पोस्ट ऑफिस उभे राहू शकत नाही, अशी आजची परिस्थिती आहे असे खुप प्रश्न आहेत. अजून एक गंभीर समस्या आहे तो म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा… नॅशनल पार्क म्हणजे फॉरेस्ट… आरक्षित जमीन… त्याच्या आजूबाजूचा भूखंड हा प्रायव्हेट फॉरेस्ट आहे आणि त्या ठिकाणी ११३ इमारती अनधिकृतरित्या मागच्या ४०-५० वर्षात बांधल्या गेलेल्या आहेत. त्यांच्यावर गडांतर आणलं पुढे सुप्रिम कोर्टाने त्यांना रिलीफ दिलीय पण त्यांना ते बांधकाम नियमीत करायचयं. पण ते अद्याप केलं गेलेलं नाही.

महायुतीचा तुम्हाला किती फायदा होईल असं वाटतं?
महायुतीचा खुपच चांगला फायदा होईल असं मला वाटतं. कारण बाळासाहेब ठाकरे आणि रामदास आठवले यांनी शिवशक्ती-भिमशक्ती महाराष्ट्रात स्थापन केली. त्यानंतर जिल्हा परिषदा, नगरपरिषदांच्या निवडणूका झाल्या. पण त्या ठिकाणी शिवशक्ती-भिमशक्ती एकत्र लढताना दिसली नाही. मात्र या लोकसभेच्या निवडणूकीत रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी जोरात कामाला लागले असल्याचं दिसतेय. आंबेडकरी जनताही प्रचारात हिरीरीने उतरलीय. शिवशक्ती-भिमशक्तीमुळे जे सामाजिक अभिसरण व्हायला पाहिजे ते या लोकसभेच्या निवडणूकीत होताना दिसू लागलंय. त्यामुळे ही शक्ती आता घट्ट होणार आणि ती घट्ट झाली की मग कुठलीही शक्ती महाराष्ट्रात या शक्तीला हलवू शकणार नाही. भाजपही यात कुठेही कमी नाहीये. ती कधी कमी नव्हतीच. नरेंद्र मोदी पंतप्रधान बनणारच.

तुमच्या उत्तर पश्चिम मतदारसंघातील मतदारांना काय आवाहन कराल?
मतदारांना मी इतकचं आवाहन करीन की, त्यांनी आपला लोकप्रतिनीधी जो आहे तो निवडताना उमेदवार किती संवेदनशील आहे त्यावर भर देऊनच मतदान करावं. निव्वळ नरेंद्र मोदींना पंतप्रधान करा म्हणून मला निवडून द्या असं मी म्हणणार नाही. माझ्यामधला अनुभव, शिक्षण, सामाजिक जाण ओळखा आणि मतदान करा… मला मदत करा!

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL