Gajanan Kirtikar

Go to English Version

मराठी मते यावेळी विभागणार नाहीत

मराठी माणसाच्या भावनेशी खेळ करून मनसेने गेल्या वेळी मतांमध्ये फूट पाडली होती. त्या वेळी आम्हाला मनसेच्या लाटेचा अंदाज आला नाही. मात्र आता मनसेला मत दिले म्हणजे काँग्रेसला मदत होते हे लोकांना समजले आहे. त्यामुळे या वेळी मराठी मते विभागली जाणार नाहीत, असा विश्‍वास उत्तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी ‘लोकमत’ कार्यालयात केलेल्या चर्चेत व्यक्त केला. (दिनांक २५ मार्च २०१४ रोजी लोकमत वृत्तपत्रातील ही मुलाखत)

Gajanan Kirtikar Intervies in Marathi Daily Lokmat

कीर्तिकर म्हणतात, खरी लढत काँग्रेससोबतच मराठी माणसाच्या भावनेशी खेळ करून मनसेने गेल्या वेळी मतांमध्ये फूट पाडली होती. त्या वेळी आम्हाला मनसेच्या लाटेचा अंदाज आला नाही. मात्र आता मनसेला मत दिले म्हणजे काँग्रेसला मदत होते हे लोकांना समजले आहे. त्यामुळे या वेळी मराठी मते विभागली जाणार नाहीत, असा विश्‍वास उत्तर-पश्‍चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार गजानन कीर्तिकर यांनी ‘लोकमत’ कार्यालयात केलेल्या चर्चेत व्यक्त केला. आपल्या विरोधात मनसेचा उमेदवार असल्याने या वेळीही मराठी मतांची विभागणी होणार नाही का?

अजिबात होणार नाही, कारण मनसेच्या कार्यपद्धतीने लोक निराश झालेले असून टोल आंदोलन, नरेंद्र मोदींबाबतची उलटसुलट भूमिका स्पष्ट झाली आहे. हा पक्ष जिंकून येऊ शकत नाही, मात्र पराभवाला कारणीभूत ठरतो आणि त्याची कॉँग्रेसला मदत होते हे समजल्याने मराठी माणूस भडकलेला आहे. त्यांची आक्रमक भाषणे, भूलथापांना बळी पडून ते आता मत वाया घालवू देणार नाहीत. मनसेच्या उमेदवारावरून लोकांना त्याची पात्रता समजलेली आहे. त्यामुळे या वेळी मतविभागणीचा धोका नसून काँग्रेसचे गुरुदास कामत यांच्याबरोबर आपली खरी लढत असून तेच आमचे ‘टार्गेट’ आहेत.

गेल्या निवडणुकीतील पराभवामुळे या वेळी काय तयारी केली आहे ? 

मराठी मतांची विभागणी झाल्याने २00९ च्या निवडणुकीमध्ये ३५ हजार मतांनी पडलो. मात्र उद्धव ठाकरेंनी पुन्हा या ठिकाणी लढण्याची सूचना केली असल्याने पहिल्यापासून तयारीला लागलो आहे. प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये प्रत्येकी ४0 कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या असून संघटनेच्या बांधणीकडे लक्ष दिले आहे. पदयात्रा सुरू असून शिवसैनिकांकडून घरोघरी आपल्या पत्रकांचे वाटप शिवसैनिक करतात. जास्तीत जास्त मतदान होण्यासाठी युवा सेना आयोजित पथनाट्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. देशामध्ये सध्या नरेंद्र मोदींची लाट असून त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार आहे. येत्या २९ मार्चला शिवसेना पक्षप्रमुख वेसावे कोळीवाड्यात जाहीर सभा घेणार आहेत. प्रचारामध्ये भाजपासह महायुतीतील सर्व नेत्यांचे सहकार्य मिळत असल्याने मतदारांचा पाठिंबा वाढत आहे. या वेळी किमान ६0 टक्के म्हणजे सुमारे १0 लाख मतदान होण्याची शक्यता आहे. वाढीव मतदानाचा निश्‍चितपणे आपल्याला फायदा होईल.

मनसेच्या उमेदवाराबद्दल काय सांगता येईल ? 

अंडरवर्ल्डच्या डॉनशी ज्याने संभाषण केल्याचे पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहेत, त्या महेश मांजरेकरबाबत आपण काय बोलणार? बॉलीवूडमध्ये होता तोपर्यंत ठीक होते, कोणाला त्याच्या वैयक्तिक बाबीबद्दल आक्षेप घेण्याचे कारण नव्हते. मात्र सार्वजनिक जीवनामध्ये अशा प्रवृत्तींना थारा मिळता कामा नये, हा माणूस देशावर हल्ला करणार्‍या अतिरेक्यांना आतापर्यंत किती तरी वेळा भेटला असू शकतो. अशांना उमेदवारी देणार्‍या पक्षप्रमुखाची वृत्ती जनतेला समजून चुकली आहे.

आपल्या प्रचाराचे ठळक मुद्दे कोणते?

मुंबईत रोज ८७ लाख प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. त्यातून मोठे उत्पन्न मिळत असले तरी सुविधांची कमतरता आहे, शौचालये नाहीत, प्राथमिक उपचार केंद्र नसल्याने प्रवासी मृत्युमुखी पडत आहेत. मुंबईचे खासदार लोकसभेत या रेल्वेच्या दयनीय परिस्थितीबद्दल आवाज उठवत नाहीत. या मतदारसंघात वर्सोवा, जुहू कोळीवाडे सीआरझेडमुळे विकासापासून वंचित आहेत. पावसाळ्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून वर्सोवा-ओशिवरा येथे पंपिंग स्टेशन बांधण्यासाठी सीआरझेडचा अडथळा आहे. जोगेश्‍वरी (पूर्व) महाकाली गुंफा या परिसरात १00 मीटर परिसरात बांधकामाला परवानगी नसताना सुरुवातीला काही अधिकार्‍यांनी पैसे खाऊन त्यांना त्या ठिकाणी घरे बांधण्यास मदत केली. आता त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडविण्याची आवश्यकता आहे. जोगेश्‍वरी आणि गोरेगावमधील नियोजित ओशिवरा रेल्वे स्थानकाचे काम २00६ साली सुरू झाले, हा प्रकल्प अद्याप पूर्ण झालेला नाही. रेल्वे, बँक भरती आणि केंद्रीय सेवेतील अन्य आस्थापने मुंबईत आहेत. त्यामध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य मिळाले पाहिजे. हे प्रचारातील प्रमुख मुद्दे आहेत.

विद्यमान खासदारांबद्दल आपले काय मत आहे?

त्यांचा मतदारसंघात संपर्क शून्य आहे. मतदारसंघातील विकासकामांसाठी केंद्राकडून जास्त निधी आणण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत. २00९ च्या निवडणुकीनंतर डी. एन. रोडला संपर्क कार्यालय सुरू केले. सुरुवातीला सहा महिने संपर्क कार्यालय स्थापून शनिवार व रविवारी भेटत होते. त्यानंतर ते कधीही नागरिकांना भेटले नाहीत. त्यामुळे या निवडणुकीमध्ये जनता त्यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही.

राज ठाकरेंचे मनमानी काम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एखाद्या बाबतीत स्वत: निर्णय घेत असले तरी त्याबाबत सहकार्‍यांची मते अजमावून घेत असत. मनसेप्रमुख राज ठाकरे मात्र मनमानीपणे काम करत असून टोलबाबतची भूमिका, भाजपाला मदत करताना सेनेच्या विरोधात उमेदवार उभे करून आपली वृत्ती दाखविली आहे.

(मुलाखत : जमीर काझी /मनोहर कुंभेजकर)

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL