Gajanan Kirtikar

Go to English Version

… आणि मी आमदार झालो!

मी रिझर्व्ह बँक एम्प्लॉईज असोसिएशन, स्थानीय लोकाधिकार समितीत 17 ते 20 वर्षे कार्यरत होतो. शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर जालना जिल्ह्याचा संपर्कप्रमुख म्हणून जबाबदारी टाकल्यामुळे जिल्ह्ययाजिल्ह्यात राजकीय काम करू लागलो होतो. 1990 सालची ‘शिवसेना महाराष्ट्र विधानसभा निवडणूक सर्वशक्तीनिशी लढणार’ असा निर्णय मा. बाळासाहेबांनी जाहीर केला. मला विधानसभा निवडणूक लढवायची आहे, अशी इच्छा मी बाळासाहेबांकडे व्यक्त केली. त्यांनी मला मुंबईतील मालाड मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा आदेश दिला. रिझर्व्ह बँकेची नोकरी सोडली आणि मी निवडणूक लढण्यास तयार झालो. माझ्या सक्रिय राजकारणाच खऱ्या अर्थाने तेव्हापासून सुरुवात झाली. मला उमेदवारी दिल्यामुळे निवडणूक लढविण्याची उमेद मिळाली. मी उमेदवार म्हणून प्रथमच निवडणुकीत उतरत होतो. परंतु शिवसेनेच्या माध्यमातून त्यापूर्वी नगरपालिका, नगरपरिषदा, जिल्हा परिषदा या निवडणुकीत सेना उमेदवारांच्या प्रचारासाठी मोठया उमेदीने काम केले होते. त्यामुळे निवडणुका लढविण्याचा अनुभव पदरी होताच. मालाड मतदार संघातून निवडणूक लढविण्याच्या निर्णयामुळे मला, माझ्या कुटुंबाला, स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांना, स्थानीक शिवसैनिकांना आनंद झाला. माझ्या निष्ठेचे चीज झाले. मा. बाळासाहेबांनी दाखविलेला विश्वास सार्थ ठरविण्यासाठी मी निवडणुकीसाठी समर्थपणे उभा राहिलो आणि मालाड विधानसभा क्षेत्रात निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने पावले टाकू लागलो.

सेना-भाजपा युतीच्या नगरसेवकांमुळे कार्यकर्त्यांच्या अथक प्रयत्नामुळे, स्थानीय लोकाधिकार समितीच्या कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमामुळे ह्या पहिल्या-वहिल्या निवडणुकीत मला विजय संपादन करता आला आणि मी आमदार झालो. 1990 साली शिवसेना-भाजपा युती सत्तेवर आली नाही. परंतु शिवसेना पक्षावर विरोधी पक्षाची जबाबदारी महाराष्ट्राच्या जनतेने सोपविली. शिवसेना ज्येष्ठनेते श्री. मनोहर जोशी हे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधीपक्ष नेते झाले. शिवसेना नेते सुभाष देसाई हे मुख्य प्रतोद व माझी प्रतोद म्हणून नेमणूक झाली. तिथून एका वेगळया राजकीय प्रवासाला सुरुवात झाली. मालाड विधानसभा क्षेत्रातील जनतेचे प्रश्न व गाऱ्हाणी सरकाररबारी मी मांडत होतो, वेळप्रसंगी भांडत होतो. उद्दिष्ट एकच, जनतेचे प्रश्न मार्गी लागावेत, त्यांना न्याय मिळावा. कारण शिवसेना ही अन्यायाविरुध्द लढणारी संघटना आहे आणि आम्ही शिवसेनेचे लढाऊ बाण्याचे शिलेदार आहोत. महाराष्ट्र विधानसभा कामकाजाविषयी माहिती करून घेतली. अधिवेशनाच्या वेळी सर्व नियमाचा अभ्यास करून विधान भवनात प्रश्न मांडीत होतो. माझ्या मतदारांच्या अडचणीबरोबर महाराष्ट्राच्या जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यात पुढाकार घेत होतो.

1995 साली झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सेना-भाजपा युतीला घवघवीत यश लाभले. सेना-भाजपा युतीचा भगवा झेंडा महाराष्ट्र विधानसभेवर प्रथमच फडकला. मुख्यमंत्री श्री. मनोहर जोशी यांनी मंत्रीमंडळाच्या दुसऱ्या यादीत दि. 27 मे 95 रोजी गृहराज्यमंत्री (शहर) पदाची जबाबदारी माझ्यावर सोपविली. एक मध्यमवर्गीय कुटुंबातील मराठी माणूस महाराष्ट्र सरकारच्या गृहराज्यमंत्रीपदी विराजमान झाला. हे उच्चस्थान मला शिवसेनाप्रमुखांनी दिले, हे मी आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत विसरणार नाही. माझ्या ह्यदयातील बाळासाहेबांचे स्थान अढळ आहे. मी व माझे कुटुंब आयुष्यभर बाळासाहेबांचे व उध्दवजींचे ॠणी राहतील.

1990 ते 2009 पर्यंत मी मालाड विधानसभा क्षेत्रातून शिवसेनेचा आमदार म्हणन निवडून आलो. माझा मतदारसंघ जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली ह्या चार उपनगरांत पसरला असल्यामुळे मध्यवर्ती ठिकाणी ‘स्नेहदीप’ मध्ये माझ्या संपर्क कार्यालयात बसून जनतेचे प्रश्न सोडविण्यात मी पुढाकार घेत आहे. माझ्या मतदारसंघातीलच नव्हे तर संघटनेच्यासंबंधी कुठलेही काम घेऊन जरी कुणी आले तर ते करण्याला मी अग्रक्रम देतो. लोकोपयोगी, समाजोपयोगी सर्व कामे या जनसंपर्क कार्यालयामार्फत होतात. लोकांचा जिव्हाळा, प्रेम, सहकार्य यामुळे माझ्या कामाला ऊर्जा मिळते.

माझ्या मतदारसंघातील प्रत्येक भागा-विभागांना मी जातीने भेटी देत असतो. मतदारसंघाच्या भेटी घेऊन, त्यांच्याशी चर्चा करून, त्यांच्या अडचणी जाणून घेत असतो. ‘लोकप्रतिनिधी म्हणून त्या अडचणी सोडविणे हे माझे आद्य कर्तव्य आहे’ या जाणिवेतून मी माझ्या मतदारसंघात अनेक कामे केली. अनेक प्रकारच्या समस्या सोडविल्या, लोकांच्या अडचणी सोडविकानाच शहर सुशोभिकरण, मूलभूत सोयीसुविधांची निर्मिती यासाठीही मी आग्रही राहीलो आहे. त्यातून अनेक उपक्रम साकार झाले, अनेक योजना आकाराला आल्या.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL