Gajanan Kirtikar

Go to English Version

गिरगाव ते गोरेगाव

गिरगावातील छोट्या- छोट्या जागेत राहणाऱ्या मध्यमवर्गीय मराठी कुटुंबातील माणसांची संख्या वाढल्यानंतर व कुटुंबातील मुलांची लग्ने झाल्यानंतर मुबंईच्या पूर्व व पश्चिम उपनगरात ती कुटुंबे राहण्यासाठी जागा शोधू लागली. माझेही तसेच झाले. माझा विवाह झाल्यानंतर गिरगावची जागा आम्हाला अपूरी पडू लागली.1973 साली गोरेगाव पूर्व येथील पांडुरंग वाडीत राहण्यास आलो. तद्नंतर रिझर्व्ह बँक कर्मचाऱ्यांनी बांधलेल्या आरे रोडवरील गृहर्निमाण संस्थेतील स्नेहदीप बिल्डिंगमध्ये स्वत:च्या मालकीची जागा घेऊन वास्तव्य करू लागलो. आजतागायत मी तिथेच राहतो.

सर्वसामान्य मध्यमवर्ग रेल्वेच्या गर्दीतून प्रवास करीत आपआपल्या कार्यालयात जाण्यासाठी धावपळ करीत असतात, तशी माझी धावपळ सुरू झाली. गोरेगावहून रिझर्व्ह बँकेच्या फोर्ट कचेरीत जाण्यासाठी मला द्राविडी प्राणायम करावा लागायचा. तेव्हा मला गिरगाव व गोरेगावच्या प्रवासाचा फरक जाणवायचा. लोकाधिकार चळवळीचे कार्यालय व रिझर्व्ह बँक एम्लॉईज असोसिएशनचे कार्यालय फोर्ट विभागात असल्याकारणाने गोरेगावला घरी येण्यास बहुतेक वेळा मध्यरात्र व्हायची.

with-subhash-desaiगिरगावच्या शिवसेनेच्या मुशीत तयार झालेला मी गोरेगावच्या शिवसेना कार्यात रमू लागलो. गोरेगाव पश्चिम तेथे ‘रंगसेवा’ या दुकानात बसून व्यवसाय बघणारे व शिवसेनेचे कार्य करणारे शिवसेना नेते श्री. सुभाष देसाई यांच्यासह तत्कालीन विभागप्रमुख श्री. विलास देवरूखकर मला तिथे भेटले. सुभाष देसाई यांनी प्रबोधन संस्था काढली होती. गोरेगाव पूर्वला सेनेची शाखा होती. भाई सामंत हे शाखाप्रमुख होते तर महिला संघटक म्हणून ऍड. सुधा चुरी काम करत होत्या. संघटनेच्या कामासाठी त्यांच्या बंगल्यावर जाऊ-येऊ लागलो. तत्कालीन रमेश तेंडुलकर, अरूण तेंडुलकर, शांतू भोसले, प्रमोद देसाई, लवू भोसले, विनोद देसाई, ही समविचारी मंडळी भेटली; तर प्रबोधनचे डॉ. मनोहर अद्वानकर, सुरेश सैतावडेकर, वसंत तावडे, अण्णा देऊळकर, पद्माकर देसाई या कार्यकर्त्यांचा परिचय झाला. जिवाभावाचे कार्यकर्ते भेटले. आनंद राणे यांच्या भेटीगाठी होऊ लागल्या आणि अल्पावधीतच गोरेगावच्या शिवसेना परिवारात मी मिसळून गेलो.

१९७८ साली शिवसेना नेते श्री. सुभाष देसाई यांनी महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढवली. माझ्या आठवणीप्रमाणे तेव्हा त्यांना इंजिन हे निवडणूक-चिन्ह मिळाले होते. त्यांच्या निवडणूक प्रचारात मी सहभागी होऊन शिवसेनेचा प्रचार केला. स्नेहदीप इमारतीत राहणारे माझे शेजारी शिवसैनिक लक्ष्मण शिरसाट, राजा सक्रे, रत्नाकर वेलिंग यांच्यासह आम्ही बाहेरून आलेल्या अनेक शिवसैनिकांनी श्री. सुभाष देसाई यांच्या निवडणूकीत हिरीरीने भाग घेतला होता.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL