Gajanan Kirtikar

Go to English Version

बाळासाहेबांची पहिली भेट

with-balasaheb-1आमच्या रिझर्व्ह बँकेत दाक्षिणात्यांची मनमानी चालू होती. मराठी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत होता. तेव्हा आम्हाला वाटले की, माननीय बाळासाहेबानी दसरा मेळाव्यातील त्यांच्या भाषणात रिझर्व्ह बँकेतील मराठी माणसावरील अन्यायाला वाचा फोडावी. रिझर्व्ह बँकेच्या दाक्षिणात्य मुजोर व्यवस्थापनाला इशारा द्यावा. हे बाळासाहेबांना सांगण्यासाठी मी, रामराय वळंजू, सूर्यकांत महाडिक, अरुण जोशी त्यांच्या निवासस्थानी ‘मातोश्री’ येथे गेलो. माझी ‘मातोश्री’मधली बाळासाहेबांबरोबरची ती पहिली भेट.

मा.बाळासाहेब मला नावाने ओळखत होते, परंतु प्रत्यक्षात भेट झाली नव्हती. त्याआधी त्यांची भाषणं मी जाहीर सभांमधून ऐकली होती, त्यांचे विचार पटले होते. त्यांच्या व्यक्तीमत्वाचे व विचारांचे मला आकर्षण होतेय. त्याभेटीत बाळासाहेबांशी सविस्तर चर्चा झाली. बाळासाहेबांना गांभीर्य कळले आणि दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी त्यांच्या स्टाईलने राजकीय परिस्थितीचे विश्लेषण केले. रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापनाला त्यांनी जाहीर इशारा दिला. त्या इशाऱ्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या व्यवस्थापनावर व्हायचा तो परिणाम झाला. रिझर्व्ह बँकेतील नोकरीत मराठी माणसाचा टक्का वाढू लागला. मराठी तरुण-तरुणांना रिझर्व्ह बँकेसारख्या मोठया बँकेत नोकरी मिळू लागली. स्थानिय लोकाधिकार समिती कार्यकर्त्यांच्या लढयास यश प्राप्त झाले होते. रिझर्व्ह बँकेतील मराठी कर्मचाऱ्यांच्या एकजुटीचा तो विजय झाला होता. मा. बाळासाहेबांच्या विचारांचा विजय होता, शिवसेनेचा विजय होता. या विजयामुळे कर्मचाऱ्यांतील उत्साह द्विगुणीत झाला आणि कार्यकर्त्यांच्या चळवळीला एक दिशा मिळाली. आज रिझर्व्ह बॅकेत 80 टक्के पेक्षा जास्त मराठी कर्मचारी आहेत.

शिवतीर्थावर माननीय बाळासाहेबांच्या मेळाव्याला वाजत-गाजत, गुलाल उधळत जाताना पराकोटीचा आनंद मिळायचा. शिवसेनाप्रमुखांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन मी शिवसेनेत कार्य करण्याचा निर्णय घेतला आणि स्थापनेपासून म्हणजेच 1966 पासून मी शिवसैनिक झालो आणि त्याच प्रेरणेने रिझर्व्ह बँकेमध्ये भूमिपुत्रांना नोकरी मिळवून देण्यासाठी मी पुढाकार घेतला.

मराठीजनांच्या सर्वांगीण विकासाचा ध्यास घेऊन, मराठी तरुणांचे स्फुल्लिंग पेटवून, मराठी जनतेच्या हितार्थ शिवसेना संघटना बांधणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राला सापत्न वागणूक देणाऱ्या दिल्लीश्वरांना आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा देऊन मराठी बाणा दाखविणारे चिंतामणराव देशमुख, ‘मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळालाच पाहिजे’ अशी घोषणा करुन त्यासाठी महाराष्ट्रात प्रचंड रणकंदन माजवून जनजागृती करणारे प्रबोधनकार ठाकरे, प्रल्हाद केशव अत्रे, एस.एम.जोशी, श्रीपाद अमृत डांगे, भारतीय सामाजिक क्रांतीचे प्रणेते, उध्दारकर्ते व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकरांच्या ध्येयसक्त कार्याचे मला विलक्षण आकर्षण वाटत होते.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL