Gajanan Kirtikar

Go to English Version

मनोगत

1खरे तर मी मूळचा मुंबईचाच, तोही गिरगावातला. गिरगावचे सांस्कृतिक,सामाजिक जाणिवांचे संस्कार जपत आणि जोपासत मी लहानाचा मोठा झालो.

16 जुलै 1964 रोजी रिझर्व्ह बँकेत ‘कॉईन आणि नोट एक्झामिनर’ म्हणून नोकरीला लागलो. नोकरी स्वीकारली तरी मनातील शिकण्याची इच्छा कमी झाली नाही. त्याकाळी नोकरी करुन मुंबई विद्यापीठाची पदवी संपादन करण्यासाठी अर्धावेळ रुपारेल कॉलेजमधून 6 वर्षांचा कोर्स केल्यानंतर 1970 साली अर्थशास्त्र विषय घेऊन मी पदवीधर झालो.

माझ्या विचारांच्या जडणघडणीला घरचे वातावरण, शाळा-कॉलेजातील शिक्षक यांचा जितका प्रभाव आहे, तितकाच प्रभाव पुस्तकांचा आणि ग्रंथांचाही आहे. मला सुरुवातीपासूनच समाजकारणाची ओढ निर्माण झाली होती. संयुक्त महाराष्ट्राची चळवळ आणि चळवळीतील सभा, मोर्चे आणि आंदोलने मी जवळून पाहात होतो. नवशक्ती,मराठा आणि नवाकाळ सारखी दैनिके नियमित वाचत होतो. प्रबोधनकार ठाकरे, आचार्य अत्रे, नीळुभाऊ खाडीलकरांचा अग्रलेख वाचल्याशिवाय मला चैन पडत नसे. त्या साऱ्यांचा कळत-नकळत माझ्या सामाजिक आणि राजकीय जडण-घडणीवर त्यावेळी परिणाम होत होता.

महाराष्ट्राच्या राजधानीत अमराठी दाक्षिणात्यांची अरेरावी पाहताना मन संतापून उठे. मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायामुळे मी बेचैन होत असे. त्याच काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ‘मार्मिक’मधून मराठी माणसावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडत होते. ‘वाचा आणि थंड बसा’ या मथळयाखाली वेगवेगळया आस्थापनातील नोकरभरतीमधील दाक्षिणात्यांच्या दादागिरीबद्दल लिहिले जायचे. त्याबरोबर तिथे नोकरी करीत असलेल्या कर्मचाऱ्यांची यादीही प्रसिध्द केली जायची. त्या यादीतील दाक्षिणात्यांची प्राबल्य आणि अधिकारी पदावरील त्यांचे आक्रमण पाहून मन पेटून उठे. अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी मराठीजनांनी एकत्र यावे, या बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा असे वाटू लागले. त्यावेळी दादर रेल्वे स्थानकासमोर असलेल्या पर्ल सेंटरमध्ये शिवसेनेचे मुख्य कार्यालय होते. तिथे माझे येणे-जाणे सुरु झाले. शिवसेनेसाठी सर्वस्व झोकून देण्याची मनाची तयारी झाली होती.

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL