Gajanan Kirtikar

Go to English Version

कंपनी- कामगार नाते दृढ होण्यासाठी थेट नोकरया देण्याची गरज : गजानन किर्तीकर

दिनांक 28-01-2014

देशात ठेकेदारी पद्धतीने नोकऱया देण्यात येत असल्याने त्यातील मोठी रक्कम ठेकेदारांच्याच खिशात जाते. यामुळे कंपन्यांनी ठेकेदार न ठेवता सरळ पद्धतीने नोकऱया दिल्यास कामगार व कंपनी यांच्यातील नाते अधिक दृढ होईल, असा विश्वास कामगार व सेनानेते गजानन किर्तीकर यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय कामगार सेनेतर्फे कुडोशी येथील अनिकेत फार्म हाऊस येथे आयोजित अखिल भारतीय पदाधिकाऱयांच्या मेळाव्यात ते बोलत होते. ते म्हणाले, रिझर्व्ह बँक हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असून प्रगतीचे एक माध्यमच आहे. यामुळे रिझर्व्ह बँकेने कोणत्याही परिस्थितीत खासगी कामे देण्याची पद्धत अंगिकारू नये. तात्पुरत्या तत्त्वावर कामगारांना सामावून घेतले तर भविष्यात त्यांनाच कायम करण्याची वेळ येईल. यामुळे आवश्यक तेवढे कर्मचारी कायमस्वरूपी घ्यायला हवेत.
स्थायी व अस्थायी कर्मचारी असे दोन प्रकार सद्यस्थितीत अस्तित्वात असून जे काम कर्मचाऱयाला दिले जाते तेच काम मात्र स्थायी स्वरूपाचे असते. याबद्दल कोणीच बोलत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली. भारतीय कामगार संघटनेची ताकद मोठी असून या संघटनेने आता असंघटित असणाऱयांसाठी काम करावे, असे आवाहनही त्यांनी शेवटी केले.
भारतीय रिझर्व्ह बँक व भारतीय सेनेतील वातावरण कौटुंबिक स्वरूपाचे असून भविष्यात कामगार संघटनेला जे जे सहकार्य लागेल ते देण्यासाठी सदैव कटीबद्ध राहू, अशी ग्वाही भारतीय रिझर्व्ह बँकेचे महाप्रबंधक आर. एल. दास यांनी दिली. रिझर्व्ह बँक व कामगारांमध्ये कुठल्याही प्रकारचे वाद नसून भविष्यातही वाद उद्भवणार नाहीत, असा विश्वासही व्यक्त केला.
माजी आमदार निशिकांत जोशी यांनी कोकणातील प्रत्येक जिल्हय़ाच्या लीड बँकेने कोकणातील पर्यटन, शेती व फळप्रक्रिया उद्योगांसाठी आर्थिक सहकार्य करून खास बाब म्हणून 4 टक्के व्याजाने तरूणांना कर्ज उपलब्ध करून द्यावे यासाठी रिझर्व्ह बँपेने बँकांना सूचना करण्याची विनंती केली. भारतीय कामगार सेनेचे अध्यक्ष सूर्यकांत महाडिक यांनी प्रास्ताविक केले. तीन दिवशीय शिबिरासाठी अनिकेत फार्म हाऊस व परिसर उपलब्ध करून दिल्याबद्दल रिझर्व्ह बँक फेडरेशनचे वतीने प्रगतशील शेतकरी सदानंद कदम यांचा सत्कार करण्यात आला.
या शिबिरास ऑल इंडिया रिझर्व्ह बँक वर्कर्स फेडरेशन, आयडीबीआय बँक, युटीआय, नाबार्ड, नॅशनल स्टॉप एक्सचेंज व भारतीय ऑईल इंडस्ट्रीजमध्ये कामगार सेनेचे 300 पदाधिकारी सहभागी झाले होते. याप्रसंगी रिझर्व्ह बँकेचे एच. आर. अनुज रंजन, आमदार सूर्यकांत दळवी, कोलकत्ता येथील सत्यव्रत करमरकर, रामचंद्र पालांडे, ऑल इंडिया वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष अरूण समाधान, भारतीय कामगार सेनेचे उपाध्यक्ष मनोहर भिसे, टी. जी. नायर, सचिव उदय शेटय़े यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

[ मागे जा ]

मुख्यपान गजानन कीर्तिकर संपर्क करा
© 2014 - All Rights Reserved @ Gajanan Kirtikar
Website Designed & Developed by PIXL